आशिष अम्बाडे, चंद्रपूर : सेल्फीची क्रेझ खेडोपाडीही पोहचलीय... पण कुठे आणि कुणासोबत सेल्फी काढावा याला काही पायपोस असावा की नाही! चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी जवळ मालडोंगरीच्या ग्रामस्थांनी सेल्फी काढले... पण त्यांच्या सेल्फीनंतर मात्र वनविभागाची चांगलीच धावाधाव झालेली पाहायला मिळाली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हे सेल्फी व्हायरल झाले आणि वनविभाग हादरला. ब्रम्हपुरी तालुक्यातल्या मालडोंगरी गावाशेजारच्या जंगलात ग्रामस्थांना मादी बिबट्या आणि दोन बछड्यांच्या हालचाली जाणवल्या. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभाग सुस्त... दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना अखेर हे नवजात बछडे दिसलेच. पण सूचना देऊनही वनाधिकारी काही आले नाही. मग काय ग्रामस्थांना सेल्फीचा मोह आवरेना... केलं क्लिक... क्लिक... क्लिक... आणि झाले फोटो व्हायरल.


कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी या बछड्यांना मग ग्रामस्थांनी झुडपांत धाडलं गेलं.  व्हायरल झालेले फोटो पाहून वनविभागाची भंबेरी उडाली. आता, मात्र वनविभागानं इथे तळच ठोकलाय. पण दोन दिवसांपासून उपाशी असलेले बछडे झुडपांत फिरतायत. अशा परिस्थितीत या बछड्यांच्या प्रकृतीबाबत ना वन कर्मचाऱ्यांना काही खबरबात ना ग्रामस्थांना... या घटनेमुळे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार मात्र समोर आलाय.