मुल्ला आणि खाकीतले चोर... ते पोलीस निलंबित
अलिबाबा आणि चाळीस चोर नव्हे तर मोहिद्दिन मुल्ला आणि खाकीतले पोलीस चोर, अशी प्रतिमा सांगलीतल्या तत्कालीन एलसीबी पथकाची तयार झाली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी निलंबित केलंय.
सांगली : अलिबाबा आणि चाळीस चोर नव्हे तर मोहिद्दिन मुल्ला आणि खाकीतले पोलीस चोर, अशी प्रतिमा सांगलीतल्या तत्कालीन एलसीबी पथकाची तयार झाली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी निलंबित केलंय.
जवळपास एका वर्षापूर्वी, मिरजेतल्या बेथेलहेमनगर इथं या प्रकरणातला मुख्य आरोपी मोहिद्दीन मुल्ला याची नंबर नसलेली बुलेट गाडी हटकली असताना सांगलीच्या एलसीबी पथकाला मोहिद्दीनच्या खिशात दीड लाख रुपये सापडले होते. त्यानंतर चौकशीअंती त्याच्या बेथेहेमनगर इथल्या घरातून पोलिसांनी 3 कोटी 7 लाख 63 हजार पाचशे रुपये जप्त केले.
कहर म्हणजे, ही रक्कम या पथकातल्या पोलिसांनी हडप केली. त्यानंतर वारणानगर इथे तपासाला गेल्यानंतर तिथे या पोलिसांनी 9 कोटी रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे यांच्यासह सात पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. सर्व पोलिसांविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात १६ मार्च रोजी भारतीय दंडविधान ४५४, ३८०,१२०(ब),१६६, १६७,४११, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रात्री उशिरा ही निलंबनाची कारवाई केलीय.