पूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण
पूलगाव दुर्घटनेत अमोल येसनकर हा तरुण जवान शहीद झालाय. जीवाची पर्वा न करता त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं... मुलगा गमावल्याचं दु:ख असलं तरी देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.
अमित देशपांडे, वर्धा : पूलगाव दुर्घटनेत अमोल येसनकर हा तरुण जवान शहीद झालाय. जीवाची पर्वा न करता त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं... मुलगा गमावल्याचं दु:ख असलं तरी देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पुलगावच्या कॅड कॅम्पच्या फायर डिपार्टमेंटमध्ये अमोल येसनकर चालक पदावर कार्यरत होते. देशसेवेनं भारलेले अमोल येसनकर ३० मे च्या रात्री ड्युटीवर आपलं कर्तव्य बजावत होते. ज्या ठिकाणी हा भीषण स्फोट झाला त्याच्या काही अंतरावर ते ड्युटीवर होते... भीषण आग विझवताना झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलंय. घरातला एकुलता एक मुलगा गमावल्यानं येसनकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय... मुलाच्या जाण्याचं दु:ख असलं तरी देशसेवा करताना वीरमरण आलेल्या मुलाचा अभिमान असल्याचं अमोल येसनकरांचे वडील वसंत येसनकर यांनी म्हटलंय.
शहीद अमोल येसनकर यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असल्यानं ते सर्वांचे लाडके होते. अमोल यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांचे भाऊ मनोहर नगराळे त्यांनी बोलून दाखवली.
या घटनेमुळे पूलगाव शहर हादरुन गेलं असून तितकंच शोकाकूल आहे. भविष्यात अशी घटना होवू नये अशीच प्रार्थना पूलगावचे नागरिक करतायत.