पुणे, नगर : शनिशिंगणापुरात तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या ठिणगीचं अखेर क्रांतीत रुपांतर होऊन महिलांना शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्यात आला. भूमाता महिला ब्रिगेडच्या पुष्पक केवडकर आणि प्रियंका यांनी शनिचौथऱ्यावरून चढून तब्बल चारशे वर्षांच्या परंपरेला मुठमाती दिली. त्याआधी अंद्धश्रद्धा निर्मुलन समितेचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लढा सुरु केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणाला विरोध करणार नाही, अशी भूमिका शनी देवस्थान समितीने घेतली आणि महिलांनी एकच जल्लोष केला. तत्पूर्वी ग्रामस्थांनी शनी चौथ-यावर जाऊन परंपरेनुसार कावडीनं पाणी आणून जलाभिषेक केला. त्यानंतर शनिशिंगणापूर विश्वस्त मंडऴानं चौथरा सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.  त्यांनंतर चौथ-यावर महिलांनी प्रवेश केला. 


१६ वर्षांपूर्वीच्या संघर्ष


महिला भाविकांनी शनिशिंगणापूरमध्ये दर्शऩासाठी मोठी गर्दी केली होती. दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सुरू केलेल्या १६ वर्षांपूर्वीच्या संघर्षाला हे यश आलंय. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चौथ-यावर प्रवेशाबाबदच्या मुद्यावरून जोरदार वाद सुरू झाला होता. त्यासाठी अनेक महिला संघटनांनी आंदोलनं केली होती. आता शनीच्या चौथ-यावर सर्वांसाठी प्रवेश खुला करण्यात आल्यामुळं आता राज्यातल्या इतर देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश खुला करण्यात येईल का याकडे लक्ष लागलंय. 


शनी शिंगणापूर इथं शनी चौथऱ्यावर जाऊन यापुढे कोणालाही दर्शन घेण्यापासून अडवलं जाणार नाही, असा निर्णय देवस्थान समितीनं घेतलाय. त्यामुळे ४०० वर्षांची ही परंपरा मोडीत निघाली आहे. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी विश्वस्तांचा विरोध डावलून चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केला. ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीनं कावडीतून पाणी वाहिलं. त्यानंतर देवस्थान समितीनं कोणालाही प्रवेशाची मुभा देण्याचा निर्णय घेतला.


आम्हाही चौथऱ्यावर जाणार : तृतीयपंथी


न्यायालयाच्या निकालानंतर आता तृतीयपंथीयांना देखील चौथ-यावर जाऊन शनी दर्शन मिळालं पाहिजे, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केलीये. एवढेच नाही तर येत्या शनिवारी सर्व तृतीयपंथी शनी शिंगणापूर इथे शनी चौथार्यावर जाऊन शनीला तेलाभिषेक करणार असल्याचा ईशारा तृतीयपंथीयांनी दिलाय.