हुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय.
शशिकांत पाटील, लातूर : लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय.
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथील २१ वर्षाच्या शीतल व्यंकट वायाळ या शेतकऱ्याच्या मुलीने शेतातील नापिकी आणि आर्थिक विवंचनेचा कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत सकाळी उडी मारून तीने आपली जीवनयात्रा संपविली. मृत्यूपूर्वी तिने एक पत्र लिहून ठेवले असून त्यात तिने आपल्या घरची परिस्थिती विषद केली आहे.
दोन बहिणींचे कसे-बसे लग्न करणाऱ्या आपल्या वडिलांना आपल्या लग्नासाठी कुणी कर्जही देत नाहीत. कारण गेल्या ४ वर्षांपासून शेतातही काही पिकत नाही. त्यामुळे घरची हलाखीची परिस्थिती न पहावल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तीने लिहिले आहे. आपण केलेल्या या कृत्यामुळे घरातील कुणालाही जबाबदार धरू नये असेही तिने शेवटी नमूद करीत आपले नाव लिहिले आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शीतलचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे सोडावे लागले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ती आपल्याच शेतात आई-वडिलांना शेती कामात मदत करीत होती.
कोवळ्या वयातील शितलला समजून घेण्यात कोण कमी पडलं... तिचे कुटुंबीय, समाज, समाजाच्या रुढी - परंपरा की शेतकऱ्याला ताठ मानेनं जगण्याचे पर्याय निर्माण करण्यात कमी पडलेलं सरकार...? हे प्रश्न अनेकांना भंडावून सोडत आहेत.
भिसेवाघोली या गावात गेल्याच वर्षी मोहिनी भिसे हिने ही अशाच कारणांमुळे आत्महत्या केली आहे. शेतकरी आत्महत्येचे लोण त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत तर पोहोचले नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर घालण्यासाठी शासन आणि समाज म्हणून आपण काय प्रयत्न करणार ते महत्त्वाचं आहे...