औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या औरंगाबादेत पक्षात उभी फूट पडलीय. आजी माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सर्व पदाधिकारी आता थेट मातोश्रीचा दरवाजा ठोठावणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या औरंगाबादेतच पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झालीय. शिवसेनेचे नेते आणि पदाधिका-यांनी जिल्हाप्रमुख आंबादास दानवे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. दानवे पदाचा गैरवापर करत आहेत. ते पैसे घेऊन पदांचं वाटप करतात. त्याचबरोबर त्यांच्या गटबाजीमुळं पक्षाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप आमदार संजय सिरसाट यांनी केला आहे. 


जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला दानवेच जबाबदार आहेत. त्यामुळं आता त्यांच्याबाबत काय तो निर्णय घेण्याची वेळ आल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत शिवसेनेची सत्ता आहे.  यापूर्वी कधीही पक्षातला वाद असा चव्हाट्यावर आला नव्हता. मात्र, आता या वादाचे पडसाद आगामी निवडणुकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेला आपला गड राखायचा झाल्यास हा वाद मिटवण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.