शिर्डीतील साईबाबा संस्थान अध्यक्षपदी बिल्डर हावरे
लाखो साई भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्तांची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. अध्यक्षपदी बिल्डर सुरेश हावरे यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई : लाखो साई भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्तांची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. अध्यक्षपदी बिल्डर सुरेश हावरे यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन विश्वस्त मंडळामध्ये भाजपतील अनेक नेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेलाही संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिर्डीचे आमदार हे विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात. पण यावेळी शिर्डीचे आमदार असलेले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना विश्वस्त मंडळात घेण्यात आलेले नाही. केवळ शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना पदसिद्ध सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डीतील भाजयुमोचे नेते सचिन तांबे, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पती बिपीन कोल्हे, खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्यासह डॉ. मनिषा कायंदे, मोहन जयकर, प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र सिंग यांचा विश्वस्त मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.