नागपूर: राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला आहे. अणेंची पत्रकार परिषद सुरु असताना स्वतंत्र विदर्भवादी आणि महाराष्ट्रवादी भिडले. नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेत जोरदार गोंधळ घातला. यावेळी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोंधळाप्रकरणी 15 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. महाराष्ट्रानं विदर्भाचा पैसा चोरल्याचं विधान अणेंनी केलं होतं. 


पश्चिम महाराष्ट्राच्या निष्क्रीयतेमुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या करत असल्याचं ते म्हणाले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच ते नागपूरमध्ये आले. यावेळी स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन पुकारणार असल्याचं अणे यांनी सांगितलं. 


मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाल्याचं सांगत वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. विदर्भासाठी सार्वमत आजमावण्याबाबत भाजप साशंक असल्याचं सांगत वेगळ्या विदर्भाच्या बाजूनं असलेल्या सत्ताधारी पक्षालाही अणेंनी टार्गेट केलं. 


मात्र अणेंच्या या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. इनमिन 200 कार्यकर्ते आणि नेते या सभेला जमले होते.