सहा जणांच्या खून करणाऱ्या डॉ. पोळबद्दल धक्कादायक खुलासे
साता-यातल्या डॉक्टर संतोष पोळनं भुलीचं इंजक्शन देऊन सहाजणांचा खून केल्याची माहिती समोर आलीय. या हत्याकांडामागं आर्थिक लाभ हे मुख्य कारण असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत असल्यानं वाईकरही सुन्न झालेत.
अरूण मेहेत्रे, झी मीडिया, सातारा : साता-यातल्या डॉक्टर संतोष पोळनं भुलीचं इंजक्शन देऊन सहाजणांचा खून केल्याची माहिती समोर आलीय. या हत्याकांडामागं आर्थिक लाभ हे मुख्य कारण असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत असल्यानं वाईकरही सुन्न झालेत.
सहा खून कधी झाले होते...
सुरेखा चिकणे, गृहिणी, राहणार वडवली, २० मे २००३ पासून बेपत्ता
वनिता गायकवाड, गृहिणी, राहणार धोम, ९ ऑगस्ट २००६ पासून गायब
जगाबाई पोळ, गृहिणी, राहणार धोम, १५ ऑगस्ट २०१० पासून बेपत्ता
नथमल भंडारी, व्यवसायाने सोनार, राहणार वाई, ७ डिसेंबर २०१५ पासून गायब
सलमा शेख, नर्स, जानेवारी २०१६ पासून बेपत्ता
आणि मंगल जेधे, अंगणवाडी शिक्षिका, १६ जून २०१६ पासून गायब
खड्डा खोदायचा आणि झाड लावायचा...
या सहाच्या सहा बेपत्ता लोकांचे खून झालेत... आणि त्यांचा खून करणारा नराधम एकच... वाई परिसरात डॉक्टर म्हणून वावरणारा संतोष पोळ... धोम गावातल्या त्याच्या राहत्या घराजवळ सुरेखा चिकणेचा सांगाडा सापडला. तर वनिता गायकवाडचा मृतदेह त्यानं कृष्णा नदीत फेकून दिला. बाकीच्या चौघांना त्यानं आपल्या फार्महाऊसवरच पुरून टाकलं. मृतदेह पुरण्यासाठी तो आधी खड्डा खोदायचा आणि लोकांना संशय येऊ नये, म्हणून त्यावर झाड लावायचा...
कशासाठी केले खून...
डॉ. संतोष पोळ हा थंड रक्ताचा सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. भूल देण्याच्या इंजक्शनचा ओवरडोस देऊन त्यानं हे खून केले. प्रामुख्यानं आर्थिक फायद्यासाठी त्यानं हे हत्याकांड घडवल्याचं सांगितलं जातंय. 13 वर्षांत केलेले खून पचवण्यासाठी त्याला कुणाची साथ होती का, याचा शोध पोलीस घेतायत.
जवळच्या व्यक्तींचा केला खून...
संतोष पोळनं ज्यांचे खून केले, त्या प्रत्येकाशी त्याचे चांगले संबंध होते. ही पोलखोल होताच मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसलाय. या नराधमाला फाशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केलीय.
पुढाऱ्यासारखा वावर...
वाई परिसरात संतोष पोळचा वावर एखाद्या कथित पुढा-यासारखा असायचा. विविध कारणांनी तो पोलिसांवर दबाव आणायचा. त्यामुळंच प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी वाईत दाखल झालेत. या परिसरातून गायब झालेल्या इतर लोकांचाही पोळशी काही संबंध होता का, यादृष्टीनं पोलीस तपास करतायत.