२२ क्विंटल कांदा विकला, नफा अवघे १० रुपये!
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी सध्या मात्र कांदा उत्पादक भुईसपाट झालाय.
नाशिक : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी सध्या मात्र कांदा उत्पादक भुईसपाट झालाय.
आधीच निसर्गाची अवकृपा त्यात कसाबसा जगवलेला कांदा तरी आधार देईल अशी भोळीभाबडी आशा उराशी बाळगलेल्या बळीराजाच्या डोळ्यात कांद्याच्या कोसळलेल्या भावानं पाणी आणलंय.
कसं जगायचं शेतकऱ्यांनी?
बागलाण तालुक्यातल्या किकवारी बुद्रुक इथल्या राकेश खैरनार नावाच्या तरुण शेतकऱ्याला साडेबावीस क्विंटल कांदा विक्रीतून खर्च वजा जाता अवघे दहा रुपये हातात आलेत.
डीएड असलेल्या राकेशनं नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानं पाच एकरात उन्हाळी कांद्याचं पीक घेतलं. पाऊस कमी पडल्यानं पाण्याआभावी अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळालं.
प्रती क्विंटल ७० रुपये
कांद्याची प्रतवारी करून काही कांदा चाळीत साठवून ठेवला तर साडे बावीस क्विंटल (२२०० किलो) कांदा विक्रीसाठी सटाणा बाजार समितीत नेला असता त्याच्या कांद्याला प्रती क्विंटल अवघा ७० रुपये भाव मिळाला. साडे बावीस क्विंटल कांद्याचे एकूण एक हजार ५७५ रुपये झाले.
नफा अवघा १० रुपये
आडत, हमाली, तोलाई, वराई असा खर्च जाता राकेशच्या हातात अवघे १३१० रुपये उरले. त्यातही किकवारी बुद्रुकमधून सटाणा इथं कांदा आणण्यासाठी १३०० रुपये वाहतूक खर्च आला. राकेश खैरनार या शेतकऱ्याच्या हातात अवघे १० रुपये उरल्याने तो पुरता हताश झालाय.