नाशिक : जीवनात आलेल्या संकटांना घाबरून अनेक जण खचून जातात. आयुष्यात पुन्हा उभारी घेऊ शकत नाहीत. मात्र नाशिकच्या सुनीता गवळी या दिव्यांग महिलेनं केवळ नियतीवरच मात केली नाही. तर इतरांना रोजगार देत अनेकांच्या मदतीलाही उभी राहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाबाहेरच्या पाच बाय दहा फुटांच्या टपरीत बसलेल्या या आहेत सुनीता गवळी. सुनीता यांना जन्मतःच हात नव्हते. त्यामुळे कसं होणार अशी चिंता त्यांच्या वडिलांना होती. मात्र सुनीता यांनी जिद्दीने अपंगत्वावर मात केली. सुनीता यांनी आपली सगळी कामं दोन्ही पायांनी करायला सुरूवात केली. त्यांच्या कामाचा आवाका भल्याभल्यांना अचंबित करणारा..


जिल्हा रूग्णालयाबाहेर त्या महिला अपंग वृद्ध यांना विविध दाखले काढून देण्यासाठी, पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करतात. पायांनाच आपले हात बनवलेल्या सुनीता पायांच्याच सहाय्याने अर्ज भरून देतात. त्यांना सफाईने कागदपत्रं जोडतात. सामान्य व्यक्तीकडून हाताने लिहीताना चुका होऊ शकतील. पण सुनीता यांच्याकडून होत नाहीत. 


केवळ बाहेरचीच नाही तर घरात भाजी चिरणे, कोथिंबिरी निवडणे, स्वयंपाक करणे ही कामंही त्या पायाने करतात. या संघर्षात त्यांना त्यांच्या पतीची मोलाची साथ लाभलीय. अपंग व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःची सामाजिक संस्थाही तयार केलीय. 


सुनीता यांच्याकडे दिवसभर गरजवंतांची रिघ लागलेली असते. प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरं देणं, त्यांना मार्गदर्शन करणं अशी मार्गदर्शकाची भूमिकाही त्या बजावतात. 


नियतीच्या तराजूत कोणाच्या वाट्याला भरभरून सूख येतं. तर कोणाच्या वाट्याला अन्याय. पण नियतीच्या या न्यायापुढे सुनीता हतबल झाल्या नाहीत. त्यांनी त्यावर तोडगा शोधून आदर्शही निर्माण केला. सुनीता यांच्या जिद्दीला सलाम...