गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीस खेळ चाले!
गुहागर तालुक्यातल्या तवसाळ आगार काशिवंडेच्या समुद्राकिना-यावर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला आहे.
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातल्या तवसाळ आगार काशिवंडेच्या समुद्राकिना-यावर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला आहे. गुरूवारी सकाळी समुद्रात 42 काठ्यांना चामड्याच्या चपला अडकवलेल्या दिसल्या. त्याशिवाय कापलेल्या कोंबड्या, नारळ, पपई, लिंबू, गोंड्याची फूल, अंडी, सीताफळ, सफरचंद, केळी, पेर, पेरू, अक्रोड, बदाम असं भरपूर साहित्य तिथे आढळलं.
सात ते आठ जणांच्या पायाचे ठसेही या ठिकाणी दिसले. सागरी रक्षक दलात काम करणा-या अवधूत पाटील आणि उमेश भाटकर यांना हा सर्व प्रकार नजरेस पडला. तातडीनं ते समुद्रात गेले त्यावेळी पाण्यात 42 काठ्या आणि चामड्याच्या चपला अडकवलेल्या त्यांना दिसल्या.
महत्त्वाचं म्हणजे या किना-यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते आणि अशा परिस्थितीत असं साहित्य आढळणं म्हणजे अजुनही समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं हेच दिसतंय. याबरोबरच सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. गुहागर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.