गांधी जयंती निमित्त डोंबिवलीत स्वच्छता अभियान
गांधी जयंतीच्या निमित्तानं डोंबिवलीच्या भोईरवाडीमध्ये नागरिकांनी स्वच्छता अभियान हाती घेतले.
डोंबिवली : गांधी जयंतीच्या निमित्तानं डोंबिवलीच्या भोईरवाडीमध्ये नागरिकांनी स्वच्छता अभियान हाती घेतले. या अभियानाअंतर्गत परिसरातील सुमारे २०० नागरिक एकत्र आले. यात अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. या प्रसंगी परिसरातील तलावाची स्वच्छता करून नंतर सर्वांनी एकत्र परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ घेतली.
सर्व नागरिकांनी मिळून तलावाच्या भोवती मानवी साखळी केली. सर्व लहान मुलांनी या प्रसंगी परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, इतर घाण साफ करून एकत्र जमा केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रथमेश तांबे यांनी घरातल्या घरात ओल्या कचऱ्यापासून खत कसे बनवता येते याबद्धल माहितीही सांगितली.
कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक श्री गणेशजी धारगळकर, बोहरी समाजाचे मुख्य भाईसाहेब, शिवमार्केट चे नगरसेवक विश्वदीप पसार, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री श्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते.
राज्यमंत्र्यांनी याप्रसंगी सर्व नागरिकांचे कौतुक करून, परिसरातील खड्डे व इतर समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे जाहीर केले. जवळपासच्या अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये कचरा वेचणार्या सफाई कामगारांना यावेळी रबरी ग्लोव्हस आणि मास्क देण्यात आलं. सर्व नागरिकांनी यापुढे भोईरवाडी परिसर स्वच्छ रहावा यासाठी "भोईरवाडी परिसर स्वच्छता समिती" ची स्थापनाही केली आहे.