मुकुल कुलकर्णी, नाशिक : स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सरकारी आकडेवारीच प्रशासनाचा हा दावा फोल ठरवतेय. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी सुरु झाल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००८-०९ आणि २०१५ नंतर पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव राज्यात दिसून येतोय. यावर्षी महाराष्ट्रात चार महिन्यात साडे सहाशेहून अधिक स्वाईन फ्लूग्रस्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले १२३ जण दगावले. नाशिक जिल्ह्याचा विचार करता २९ जणांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांची संख्या शंभरीच्या दिशेने चाललीय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर सवाल उपस्थित होतायत. याची चाचपणी करण्यासाठी राज्य सर्वेक्षण अधिकारी आणि आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव राज्यभर दौरे करत आहेत. 


या अंतर्गत राज्यात नाशिक जिल्ह्यात सरकारी अधिकारी आणि खासगी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत खासगी डॉक्टर आणि सरकारी डॉक्टर यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याचं आकेडवारी सिद्ध करतेय. मात्र याला आरोग्य यंत्रणेचं अपयश नाही तर हवामानाला दोषी धरलं जातंय.  


यावर्षी पावसाळ्यातही स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी आत्तापासून खबरदारीचे उपाय योजण्याची गरज आहे. नाही तर अधिका-यांचे दौरे होत राहतील, प्रशासन दावे प्रतिदावे करत राहील आणि सर्वसामान्य जनता मात्र स्वाईन फ्लूची बळी ठरत राहील. हे टाळायचं असल्यास प्रशासनाला वेळीच खबरदारी घ्यावी लागेल.