प्रफुल्ल पवार, रायगड : पावसाळा म्हटलं की साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं आणि मग पावलं आपोआप डोंगरदऱ्या, धबधबे, धरणांच्या दिशेनं वळतात. वीकेन्डला चिंब भिजण्याचं मुंबई, पुणेकरांचं हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन म्हणजे कर्जतमधले धबधबे किंवा लोणावळ्याचा भूशी डॅम... पण आज आपण आणखीन एका 'हॉटस्पॉट' विषयी जाणून घेणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वळणावळणाची वाट... कधी पावसाची दमदार सर तर कधी मधूनच चमकणारं ऊन... अशा नयनरम्य वातावरणात ताम्हिणी घाटाचा प्रवास सुरू होतो... धुक्यातून डोकावणारे हिरवेगार डोंगर आणि त्यातून वाट काढत फेसाळणारे धबधबे... सारंच कसं मन प्रसन्न करणारं... ताम्हिणी घाटातलं पावसाळ्यातलं हे सौंदर्य फारसं कुणाच्या दृष्टीस पडलं नसतं... पण कोकणातून पुण्याला जाणारा नवीन रस्ता झाला आणि निसर्गाचा हा खजिना सर्वांसाठी मोकळा झाला... ताम्हिणी घाटातल्या सौंदर्यानं साऱ्यांनाच भुरळ घातलीय. 


खरं तर एरवी भयाण वाटणाऱ्या या घाटातल्या खोल दऱ्या हिरवाईनं नटल्यानंतर मनाला अक्षरश: मोहवून टाकतात... असे धबधबे या रस्त्यावर पावलागणिक पाहताना, निसर्गाच्या सानिध्यात सारेच भान विसरतात. धो धो कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटक मनसोक्त भिजतात. वर्षाविहाराचा आनंद घेतात. मनसोक्त भिजल्यानंतर गरमागरम कणीस खाणं तर शब्दातीत.  


ताम्हिणी घाटात एकदा आलं तर वारंवार येण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. कारण इथला नजाराच भूरळ पाडणारा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडमधून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून थेट ताम्हिणी घाटात पोहचता येतं... पुण्याहून मुळशीमार्गे ताम्हिणी घाट जवळ आहे... कित्येक वर्षे नजरेआड राहिलेला हा परिसर अलीकडच्या काही वर्षात चांगलाच नावारूपाला आलाय. अन्य गर्दीच्या ठिकाणांपासून सुटका हवी असेल तर ताम्हिणी घाट वर्षा पर्यटनासाठी एक चांगलं डेस्टिनेशन आहे...