हडपसर : पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे. वानवडी येथे शिक्षकाने शिक्षिका पत्नीवर चाकूने वार करून खून केला, ही धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. स्नेहा कदम यांच्या खून प्रकरणी पती सुनील दत्तात्रय कदम यांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहा सुनील कदम या ३५ वर्षाच्या होत्या, त्या  मनुचंद्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, आझादनगर, वानवडी येथे राहत होत्या. तर त्यांचे पती सुनील दत्तात्रेय कदम हे  रा. पाथर्डी, जि. नगर, सध्या रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे येथील आहेत.


आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शिक्षिकेचे वडील बाबासाहेब केसू चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.


स्नेहा आणि सुनील यांचा १६ वर्षापूर्वी विवाह झाला होता. स्नेहा-सुनीलमध्ये वारंवार भांडणे होत असत.स्नेहा-सुनील दोघेही एक वर्षापासून विभक्त राहत होते. यापूर्वी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी सुनीलवर स्नेहाने गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली होती. आठ दिवसांपासून तो पुन्हा स्नेहाला भेटण्यासाठी येत असे. काल स्नेहाआणि मुलांना घेऊन तो फिरण्यास गेला होता. रात्री आठला त्यांना घरी सोडून तो बाहेर पडला.


 रात्री एकच्या सुमारास सुनील मद्यप्राशन करून पुन्हा स्नेहाच्या घरी आला. जोरजोरात दार ठोठावून त्याने दार उघडण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, स्नेहा झोपी गेली असल्याने मुलाने दार उघडले. त्यानंतर सुनील याने स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतले. 


मात्र त्यानंतर, मुलगा झोपी गेला, आणि पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले.या वेळी तुम्ही मद्यप्राशन करून आलात, बाहेर गाडीतच झोपा, असे स्नेहाने पतीला सांगितले. तिने पतीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबरदस्तीने दार ढकलून तो घरात शिरला आणि खिशातील चाकूने दोनवेळा स्नेहाच्या छातीत गंभीर वार केले. 


या हल्ल्यात गंभीर जखमी स्नेहाने ओरडून मदतीसाठी मागणी केली आणि ती खाली पडली. 


या वेळी पतीने वार केलेला चाकू स्वतःच्या खिशात ठेवला आणि किचनमधील चाकू स्नेहाच्या हातात ठेवला आणि तेथून पळ काढला. घाबरलेल्या मुलाने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहाला शेजाऱ्यांनी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलविले, मात्र उपचारांपूर्वीच तिचे निधन झाले.