ठाणे : ठाणे पालिकेत महापौर झाल्यानंतर महिना उलटला तरी पालिकेची स्थायी समिती स्थापन झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प यंदा स्थायी समितीऐवजी आज नियोजित महासभेत सादर करणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाला मंजुरीही महासभेतच देण्यात येणार आहे. 


ठाणे पालिकेत महापौर बसल्यावर निश्चित कालमर्यादेत कोकण आयुक्तांच्या निर्णयाने संख्याबळ निश्चित करून स्थायी समिती गठीत करण्यात येते. ठाणे पालिकेची स्थायी समिती गठीत करण्याची शेवटची तारीख २२ मार्च होती. तत्पूर्वी कोकण आयुक्तानी त्वरित संख्याबळाचा निर्णय देऊन स्थायी समिती गठीत करण्याचे आदेश देणे गरजेचे होते. 


मात्र, आतापर्यंत संख्याबळ निश्चित नसल्याने स्थायी समिती अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे यंदा मात्र पालिकेचा अर्थसंकल्प हा आज होणाऱ्या महासभेत सादर करण्यात येणार आहे. पालिका आयुक्तानी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मात्र त्यावर नगरसेवक अर्थसंकल्पात वाढीव तरतुदी या चर्चेअंती करून मगच अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येईल.


दरम्यान, कोकण आयुक्तांचा कारभार हा जलद होणे गरजेचे आहे. इतर पालिकांमध्ये काही दिवसातच स्थायी समितीचे संख्याबळ निश्चित करण्यात आले. मात्र ठाणे पालिकेच्या संख्याबळाचा निर्देश आतापर्यंत कोकण आयुक्तांनी दिला नसल्याने शिवसेनेला बगल देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा संशय निर्माण होत आहे. दरम्यान, स्थायी समिती गठीत नसल्याने कामांना मंजुरी देता येत नसल्याने ठाणेकरांची कामे ठप्प झाली आहेत.