नाशिक : राज्यातील पहिली एमबीए महिला सरपंच नाशिक जिल्ह्यातील वाडीव-हे या गावाला मिळाली आहे. प्रिती शेजवळ असं या उच्चशिक्षित महिला संरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रिती शेजवळ यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ( व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वाडीव-हे. नाशिक मुंबई मार्गावर अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. आठ हजार लोकसंख्येच्या या गावाची ग्रामसचिवालयाची इमारतही देखणी आणि त्यांच्या सरपंचही तेवढीच हुशार आणि उच्चशिक्षीत. सरपंचपदावर विराजमान झाल्यावर केवळ राजकारण न करता प्रिती शेजवळ यांनी एमबीए पूर्ण केलं. गावाची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीपुरवठा. गावाच्या जवळपास तीन चार मोठी धरणं आहेत. गावातल्या शेतक-यांच्या जमिनीही त्यासाठी गेल्या आहेत. तरीही गावाला २४ तास पाणी मिळत नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा पाणी समस्या सोडवण्याचे प्रिती यांचे प्रयत्न आहेत. 


सरकारच्या विविध आरक्षणांमुळे शेतक-यांचा सातबारा लाल असल्यामुळे शासकीय मदतीपासूनही गावकरी वंचित राहात आहेत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीचा कारभार, स्वतःचं शिक्षण सांभाळून प्रिती यांनी स्वतः शेतीसंदर्भातल्या विविध प्रयोगात लक्ष घालण्यास सुरूवात केली. एमबीए फायनान्स असल्यामुळे विविध कंपन्यांकडून सीएसआर फंड घेत गावाचा विकास करायला सुरूवात केली. या संबंधीचे अनेक प्रोजेक्ट शेजवळ यांनी केलेत. 


ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा कऱण्यासाठी गावात कंपन्यांच्या मदतीतून एटीएम कार्डद्वारे शुद्ध पाणी देण्यात येणार आहे. गावात स्वच्छतेसाठी घंटागाडीही तैनात करण्यात येणार आहे. महिला सरपंच या अनेकदा केवळ सहीपुरत्या असतात असा एक सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातल्या वाडीव-हे गावाच्या सरपंच प्रिती शेजवळ याला अपवाद ठरत आहेत. गावाचं कॉर्पोरेट पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. पण या प्रयत्नात लालफीतशाही अडसर ठरू नये एवढीच इच्छा.