नागपूर : हाय सिक्युरिटी झोन समजल्या जाणाऱ्या नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय परिसरात एका व्यक्तीने मध्यरात्रीनंतर सुमारे चार तास धुमाकूळ घातला. शहराच्या महाल भागातल्या संघ मुख्यालय परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर चढत या व्यक्तीने गोंधळ घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघ मुख्यालयावर याआधी दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं जगजाहीर आहे. नागपूरच्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाल भागात आरएसएस मुख्यालयाचा परिसर आहे. इथे कायम 3 स्तरीय सुरक्षा असते. सीआयएसएफ, आरएएफ, स्थानिक पोलीस यांची सुरक्षा व्यवस्था इथे 24 तास तैनात असते. 


या मुख्यालयापासून अगदी 50 मीटरच्या अंतरावर बावणे नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर इमारतीचं बांधकाम सुरू होतं. 25 ऑगस्टच्या मध्यरात्री बावणे यांच्या शेजारी राहणा-या साल्पेकर कुटुंबिय़ांना आपल्या वाड्याच्या छतावर कोणीतरी चालत असल्याची चाहूल लागली. त्यांनी तपासले असता वाड्याला लागून असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या छतावर एक व्यक्ती गोंधळ घालताना दिसला. त्याने छतावरून उडी मारण्याचीही धमकी दिली.


साल्पेकर कुटुंबियांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. छतावर चढलेली ही व्यक्ती पोलीस आणि अग्निशमन अधिका-यांचे काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. हातातल्या सळईने त्याने अधिका-यांना आणि कर्मचा-यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. रात्री दीड वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. गोंधळ घालण्यात आलेला व्यक्ती हा मध्यप्रदेशातला असून त्याचं नाव सुरेश नेवारे असं आहे. तो मानसिक रूग्ण असल्याचं पोलिसांनी म्हटले. या वर्षाच्या सुरूवातीलाच संघ मुख्यालयाला लागून असलेल्या मंदिरात चोरी झाली होती. आता या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.