जळगाव : शिवसेनेचे नेते आणि जळगावचे बडे नेते सुरेश जैन यांना तब्बल साडे चार वर्षांनंतर जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. ते आज जळगावात दाखल होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश जैनांची आज सुटका होतेय. कालच निर्णयाची प्रत धुळे न्यायलयात जमा करून सुरेश जैनांची सुटका करवून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या कुटुंबियांनी केला. मात्र न्यायालयानं याबाबत शनिवारी म्हणजेच आज सर्व प्रक्रिया करण्यास सांगितल्यानं कुटुंबियांचा आणि जैन समर्थकांचाही हिरमोड झाला. आज दुपारपर्यंत जैन कारागृहाबाहेर येतील. मात्र त्यांच्या समर्थकांची जिल्हा कारागृहाबाहेर गर्दी होण्याची शक्यता पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


जळगाव महापालिकेच्या घरकुल योजनेत 29 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जैन यांना 10 मार्च 2012 रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जैन यांनी अनेकदा जामीन मागण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. काल अखेर सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला.  2005 साली जळगाव महापालिकेत आयुक्तपदी असताना डॉ. प्रवीण गेडाम यांनी जळगाव नगरपरिषदेत राबवलेल्या घरकुल योजनेत झालेला गैरव्यवहार बाहेर काढला. 


याविषयी 2006मध्ये फिर्याद नोंदवली. त्यानुसार तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, आणि नगरपालिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढची चार पाच वर्ष काहीच कारवाई झाली नाही. 2011मध्ये जळगावचे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या ईशू सिंधू यांच्याकडे घोटाळ्याचा तपास आला. 


सिंधूंनी पूर्ण प्रकरण अभ्यासून कठोर पावलं उचलायाला सुरूवात केली. आधी प्रदीप रायसोनी, नाना वाणी, राजा मयूर, या सुरेश जैन यांच्या अत्यंत निकटवर्तीयांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यावर 10 मार्च 2012ला जैन यांना अटक झाली. तेव्हापासून जैन तुरूंगात आहेत. 


माजी मंत्री सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टानं जामीन दिल्यानंतर त्यांच्या जळगाव या शहरात जल्लोष करण्यात आला. जैन समर्थकांनी महापालिका आवारात एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त केला. महापौर नितीन लढ्ढा यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.


का हा योगायोग?


जळगाव घरकूल घोटाळ्यातले आरोपी सुरेश जैन यांना जामीन मिळणं, ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची घटना आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून वारंवार अर्ज करूनदेखील जैनांना जामीन मिळत नव्हता.


जळगावचे भाजप नेते एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यातल्या राजकीय संघर्षाला तर अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यात खडसे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर जैनांना जामीन मिळण्याची शक्यता अधिकच धूसर झाली होती. मात्र खडसेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि सुरेश जैनांना जामीन मंजूर झाला. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या वाढदिशीच सुरेश जैनांना जामीन मिळावा, हादेखील एक अजब राजकीय योगायोग मानला जात आहे.