मुंबई : स्वाभिमान संघटना आक्रमक पवित्रा घेत कोकणात जाणाऱया वाहनांना खालापूर टोलनाक्यावरून विनाटोल सोडण्याचे आंदोलन सुरू केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गाची झालेली चाळण आणि महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालिन पुल कोसळल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या सोसाव्या लागणाऱया टोलच्या भुर्दंडातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्याची मुक्तता व्हावी म्हणून  हे आंदोलन करण्यात आले होते. 


येत्या 4 सप्टेंबरपर्यंत स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते टोलनाक्यांवर उपस्थित राहून कोकणवासियांना टोलफ्री प्रवास घडवून देणार आहेत. फक्त कोकणात जाणाऱया वाहनांनी कोकण नावाचा फलक लावावा, असे आवाहनही स्वाभिमान संघटनेचे नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी तमाम कोकणवासियांना केले आहे.


युती सरकारच्या गलथान कारभारामुळे मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशा वाताहत झाली आहे आणि त्यांची दुरूस्ती गणेश विसर्जनापर्यंत सरकारकडून होणे अशक्य आहे. तसेच महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱया चाकरमान्यांना पर्याय म्हणून पनवेल,पुणे, कोल्हापूर आणि सातारा या महामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे हे स्पष्ट होते. 


यादरम्यान चाकरमान्यांना या मार्गांचा भुर्दंड पडू नये म्हणून राज्य सरकारने या मार्गांवर टोल माफी द्यावी अशी मागणी स्वाभिमान नेते नितेश राणे यांनी राज्य सरकारला केली होती. टोल माफी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी सरकारला दिला होता. मात्र सरकारने ही मागणी फेटाळल्यामुळे अखेर स्वाभिमानचे कार्यकर्ते महामार्गावर उतरले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोकणात जाणाऱया वाहनांना विना टोल सोडण्यास सुरूवात केली. 


सरकारला अजूनही जाग आलेली नाही. ते कोकणी माणसांवर अन्याय करत आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. स्वाभिमानचे कार्यकर्ते खालापूर आणि लोणावळा या टोलनाक्यांवर उभे राहून कोकणात जाणाऱया वाहनांना विना टोल सोडणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. जे सरकारला करायला हवे होते, ते आम्ही करणार आहोत. 


आमच्या आंदोलनामुळे तरी सरकारचे डोळे उघडतील आणि ते कोकणात जाणाऱया वाहनांना गणेशोत्सवादरम्यान टोलपासून मुक्ती मिळवून देतील, अशीही आशा व्यक्त केली.