मुंबई : राज्य सरकारचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. तूर खरेदीच्या मुदतवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मौन काही सुटलेलं नाही. तर, दुसरीकडे तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणी आमदार राजू शेट्टींनी केलाय. या प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.


मुदतवाढ नाहीच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूर उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. केवळ २२ एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीचीच खरेदी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं तूर खरेदीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं तूर विक्री न केलेल्या शेतक-यांची अडचण होणार असल्याचं दिलंय.


सदाभाऊंना अजूनही आशा...


तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्र सरकारकडे राज्य पाठपुरावा करत असून परवानगी मिळेल, असा आशावाद पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलाय. तूर खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल, असं  आश्वासनही सदाभाऊ खोत 'झी मीडिया'शी बोलताना दिलंय.


विरोधी पक्ष आक्रमक


राज्यात तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. याप्रश्नी विरोधी काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. राज्य सरकार तुरडाळ खरेदीबाबत निर्णय घेणार नसेल तर काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तर शेतकरी आत्महत्येसाठी आणखी एक विषय कारणीभूत ठरेल अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


शेतकरी संतप्त


नाफेडनं शेतकऱ्यांची तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. जालन्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तूर खरेदी बंद झाल्यानं घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरीमध्ये अंबड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. तर परभणीत खुद्द स्वाभीमानी शेतकरी सघटनेच्या वतीनं सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पुतळा जाळण्यात आला. खरेदी केंद्राबाहेर तूर पडून आहे. केंद्राबाहेरच शेतक-यांनी आंदोलन केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात शेतक-यांनी यावेळी घोषणाबाजी केली.


राज ठाकरेंनीही केली मागणी


सरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या 24 तासांत सुरु करावी अशी मागणी मनसेनं केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारकडे ही मागणी केलीय. शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलीय. अन्यथा मनसे राज्यभर आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.