अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : चालत्या रेल्वेगाडीतून अतिशय सफाईने प्रवाशांचे दागिने चोरणा-या एका गँगला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलंय. चेनच्या मदतीने बांधलेल्या सूटकेस किंवा मोठ्या बॅगचेन्स कापून सफाईने चो-या करणारी ही टोळी कटर गँग म्हणून ओळखली जाते. 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धावत्या गाडीतून चोरी करणा-या चोरट्यांचा हा डेमो पाहीला की यांची हातचलाखी किती यशस्वी झालीय याची कल्पना येईल. चेनला बॅगा बांधून ठेवल्या असल्या तरीही आरामात ते चेन कापून चो-या करायचे. चेन कापणं शक्य नसेल तर बॅग किंवा सूटकेसची चेन अलगद उघडून त्यातील रोख आणि दागदागिने चोरी व्हायचे. सहसा मध्यरात्री किंवा पहाटे या चो-या होत असल्यामुळे प्रवाशाच्या लक्षातही उशीरा यायचं. 


संशय यायला नको म्हणून चोरलेलं सामान गँगच्या सदस्यात वाटून दिलं जायचं. पकडले जाऊ नये म्हणून गँगचे मेंबर्स वेगवेगळे प्रवास करायचे. चोरी केल्यावर हे सर्वजण थेट बिहारमध्ये पाटणा स्टेशनवरच भेटत असत. या टोळीची टीप मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. 


या तपासातून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवाशांनो सावधान, चेनला बांधून तुमचं सामान सुरक्षित आहे या गैरसमजात राहू नका, रेल्वे प्रवासात अखंड सावधान राहा...