नाशिकमध्ये दोन मृतदेह आढळल्यानं खळबळ
नाशिक शहरात दोन मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिक शहरात दोन मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईएसआय हॉस्पिटलजवळ लक्ष्मण विटकर या तरूणाचं डोकं ठेचून हत्या करण्यात आली. मृतदेहाजवळ दारूच्या बाटल्या आढळल्याने रात्री दोनचार जणांची दारूपार्टी झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.
तर नाशिकच्या दारणा नदीच्या काठावरही एका तरूणाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता स्थानिक राजकीय पदाधिका-याच्या भेळेच्या दुकानात काम करणाऱ्या कृष्णा नागे नावाच्या मुलाचा हा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालंय.
या दोन्ही घटना रात्रीच्या सुमाराला घडल्या आहेत. एकाचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय, तर दुसऱ्या मृत्यूचा तपास सुरू आहे. पण या दोन हत्यांमुळे नागरिक हादरून गेलेत. शहरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागलीय.