शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या गाडीनं चिरडलं, दोघांचा मृत्यू
नागपुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.
नागपूर : नागपुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरच्या प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या मारुती ८०० कारनं ७ जणांना चिरडलं, त्यात सहा महिन्याची बालिका आणि ६० वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला.
आसिया ताज मोहम्मद आणि इस्लाम बी शेख अशी या दोघींची नावं आहेत. तर इतर तीन महिला आणि दोन पुरुष जखमी आहेत. प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या पत्नी सुरेखा तळवेकर निवडणूक लढवत आहेत.
शनिवारी संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान शिवसेना कार्यकर्ते वनदेवी नगरात प्रचार करत होते, त्यावेळी एका वळणावर प्रचारासाठी वापरात असलेल्या मारुती ८०० कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती थेट शेजारच्या झोपडीत घुसली.
झोपडीतले कुटुंब त्या कारखाली चिरडलं गेलं. या अपघातानंतर लोकांनी कारमधील शिवसेना कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून गेले. तेव्हा संतप्त जमावानं त्या कारची तोडफोड केली. पोलिसांनी याप्रकरणी कारचालक गौरव बोरकरला अटक केली. दरम्यान, घटनेनंतर शिवसेना नेत्यांनी मौन बाळगलं असून नगरसेवक बंडू तळवेकरही आऊट ऑफ रीच आहेत.