कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गव्यानं दोघांना ठार केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उसाचं पाचड काढायला गेलेल्या शेतकरी तरुणांवर गव्यानं पहिल्यांदा हल्ला केला तर या शेतकऱ्याच्या हल्ल्याचं चित्रीकरण करायला गेलेल्या स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे यांनाही गव्यानं जोरदार धडक देऊन ठार केलं.


आकुर्डे इथले तीन तरुण वैरण म्हणून उसाचा पाला काढण्यासाठी उसात गेले होते. गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने त्या तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. पोटात शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने पोवार हा जागीच ठार झाला. जीव वाचवून पळालेल्या दोघांनी ग्रामस्थाना या दुर्घटनेची माहिती दिली.


हे वृत्त कळताच तात्काळ 'बी न्यूज'चे रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते. बांधावर उभं राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना धडक देऊन 10-12 फुटांवर उडवून भिरकावून दिले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.