संतोष लोखंडे, बुलडाणा  : कोवळ्या कळ्या गर्भातच खुडण्याचे अनेक प्रकार वाढण्याने या विरोधात शासनाने कडक कायदा आणला. तरी देखील वंशाला दिवा हवाच,ही मानसिकता काही बदलायला तयार नाही. यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी जनजागृतीचा लढा उभारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासनाकडूनदेखील जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करण्यात येतात. या सामाजिक उपक्रमात आपला देखील खारीचा वाटा असावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथील उद्धव गाडेकर याने चक्क जन्मदात्या पित्याची सहा महिने मोफत दाढी कटिंग करण्याची अनोखी योजना जाहीर केली आहे. 


उद्धव गाडेकर...सर्वसामान्य दिसणारा माणूस आपल्या एका निर्णयाने आज अवघ्या बुलढाण्यात चर्चेचा विषय झालाय. गाडेकर यांचा हेअर सलूनचा व्यवसाय आहे. पंचक्रोशीतील गावात मुलगी जन्माला आली तर जन्मदात्या मुलीच्या वडिलांची सहा महिने मोफत दाढी कटिंग करून देण्याचा संकल्प त्यानं केलाय. सोबतच बाळाच्या जावळाची कटिंग देखील मोफत करून देण्याचा निर्णय त्याने घेतलाय. तशा आशयाचे बोर्डही त्यानं दुकानात लावलेत.. 


मुलींचा घटता जन्मदर हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही मुलींचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात मुलींचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं नाना उपक्रम राबण्यात येतात. या उपक्रमात सहभागी होत उद्धव गाडेकर यानं या सामाजिक उपक्रमात आपला खारीचा वाटा उचललाय..  


त्याच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनानं त्याला प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव केला आहे. उद्धव याच्या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून गावातील मित्रपरिवार व ग्रामस्थ त्याचे कौतुक करत आहेत. 


उद्धव प्रमाणे जर प्रत्येकाने या अभियानात सहभाग घेतला तर जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर निश्चितच वाढेल.