देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भक्ताभिमानी गणराज एक: !


क्षेत्रे मढाख्ये वरद: प्रसन्न: !!


यस्तिष्ठती श्रीवरदो गणेश: !


विनायकस्त प्रणमामि भक्त्या !!


भक्तांविषयी अभिमान बाळगणारा... गणांचा अधिपती... मढ नावाच्या क्षेत्रामध्ये वास असणारा... ज्याचं रुप प्रसन्न आहे असा श्री वरद विनायक... अष्टविनायकांपैकी एक म्हणजेच हा महडचा श्री वरद विनायक...


व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा... 


भक्तांचं श्रद्धास्थान


रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामधल्या महड गावात श्री वरद विनायक विराजमान आहेत... नवसाला पावणारा वरद विनायक म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान... पूर्वाभिमुख असलेलं हे वरद विनायकाचं मंदिर पूर्वी एखाद्या कौलारु घराप्रमाणं होतं... आता मंदिराचा कायापालट झालाय... मंदिराच्या चारही बाजूंना हत्तीच्या सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत तर उत्तरेला गोमुख आहे... इथंच तो अखंड दगडाचा कोनाडा आहे ज्यात प्रथम श्रींचं वास्तव्य होतं... मंदिराच्या घुमटावर सोनेरी रंगाचा कळस असून त्याच्या वरच्या बाजूला नागाची नक्षी आहे... पाठीमागे पश्चिमेस देवाचं तळं दिसून येतं.


गाभाऱ्यात प्रवेश करताक्षणी रिद्धी-सिद्धीच्या कोरीव आणि दगडी मूर्ती नजरेचा ठाव घेतात... दोन्ही बाजूंना कोनाड्यात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत... त्यातली डावीकडची मूर्ती शेंदूरचर्चित तर उजवीकडची संगमरवरी उजव्या सोंडेंची आहे... 


दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर वरद विनायकाची ही मूर्ती विराजमान असून हे लोभस रुप पाहून सारेच जण त्याच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाहीत...बाप्पाच्या जवळ जाऊन पूजा करता येत असल्यामुळे भाविकांना एकप्रकारे आत्मिक समाधान लाभतं... वरद विनायकाच्या सिंहासनावर दोन हत्ती आणि मध्ये देवी कोरण्यात आलीय. गणेशाची मूर्ती थोडी वेगळी असून ती डाव्या सोंडेची आहे... या मनोवांच्छित वर देणा-या वरद विनायकाच्या मंदिरातला नंदादीप गेली 107 वर्ष अव्याहत तेवत आहे...



वरदविनायकाची आख्यायिका


महडच्या वरद विनायकाच्या देवालयाची स्थापना वेदप्रसिद्ध गृत्समद ऋषीनं केली अशी आख्यायिका आहे...गणानां त्वा गणपतिं हवामहें या ऋचेला सिद्ध करणारा आणि ऋग्वेदावीत दुसरं मंडल रचणारा हा मंत्रद्रष्टा ऋषी म्हटला जातो. त्यानं विनायकाची खडतर तप करून आराधना केली, तेव्हा श्रीविनायक त्याच्यावर प्रसन्न झाला आणि वर माग म्हणाला. गृत्समदानं स्वत:ची शुद्धी आणि आपल्या तपश्चर्येच्या स्थानी देवाचं कायमचं वास्तव्य अशा दोन गोष्टी मागितल्या. श्री विनायकानं गृत्समदाच्या दोन्ही गोष्टी मान्य करून तो त्या अरण्यात स्थिर झाला... ते अरण्य म्हणजेच महडचा आजचा भूभाग होय... गृत्समद ऋषी हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक आहे... त्यामुळे या स्थानाला फार महत्त्व प्राप्त झालंय...


श्री वरद विनायकाची स्वयंभू मूर्ती 1690 मध्ये श्री. धोंडू पौडकर यांना तळ्यात सापडली होती... तळ्याजवळच गावदेवीचं देऊळ आहे... त्याठिकाणी काही काळ ही मूर्ती ठेवण्यात आली होती... त्यानंतर 1725 मध्ये वरद विनायकाचं देऊळ बांधण्यात आलं... त्यासाठी पेशव्यांचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी पुढाकार घेतला होता...या मंदिराला छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांनी सनद दिली होती. 


भाविकांसाठी श्री गणपती संस्थानानं अन्नछत्र, भक्त निवासासोबतच अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यायत... अष्टविनायकांपैकी एक असलेल्या या वरद विनायकाची ख्याती अगदी सातासमुद्रापार पोहोचलीय... गणेशाच्या दर्शनासाठी राज्यातून, देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक हजेरी लावतात....
 
आत्मिक समाधान, सुख शांती मिळावी यासाठी वरद विनायकाच्या दरबारात भाविक भक्त गण मोठ्या संख्येनं नतमस्तक होतात... माघी गणेशोत्सव, अंगारकी चतुर्थी, भाद्रपद चतुर्थीला तर भाविकांची ही संख्या हजारोंच्या घरात असते... अशा या अलौकिक वरद विनायकाच्या महड नगरीत गणेशभक्तांची नेहमीच वर्दळ पहायला मिळते... 



निसर्गरम्य महड


महड...रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातलं निसर्गसंपन्न गाव...गावाची लोकसंख्या सहाशे-सातशेच्या आसपास... ध्यानधारणा आणि ईश्वरोपासनेसाठी श्री वरद विनायकाचा हा परिसर अतिशय रम्य आहे...पावसाळ्यात तर महडची शोभा अवर्णनीय असते...केवळ भाविकच नव्हे तर परदेशी पक्ष्यांनाही या महड नगरीची भूरळ पडल्याचं दिसतं... गाव लहान असलं तरी आता हळू हळू ते विस्तारु लागलंय... इथली नवीन बांधकामं त्याचंच द्योतक...


मंदिर परिसराला नेहमीच जत्रेचं स्वरूप आलेलं असतं... दिवसाकाठी हजारो गणेशभक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या येण्यानं गावक-यांच्या उदरनिर्वाहाचीही चिंता काही प्रमाणात मिटते... भातशेतीबरोबरच भाजीपालाही महडमध्ये घेतला जातो...  



वरद विनायकाच्या महड गावात स्त्रीशक्तीचा महिमा दिसून येतो... सगळ्याच कामात त्या अग्रेसर असून बचतगटाच्या माध्यमातूनही सक्रिय आहेत... आपल्या गावाचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांच्या बोलण्यातून वारंवार स्पष्ट होतं... 


तर असा हा वरदविनायक आणि त्याच्या महड गावाचा महिमा...लोभस मूर्ती, आपुलकीनं होणारं स्वागत, निसर्गसौंदर्यानं नटलेला परिसर तुम्हाला नक्की भावेल यात शंका नाही.