अमरावती : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नावे, 'व्हॉट्स अप' वर संदेश  पाठवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावर विठ्ठल जाधव यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र यावरून पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कथित व्हॉटस अॅपवर पाठवलेल्या संदेशात विठ्ठल जाधव यांनी म्हटलंय, 'मराठा असल्याने माझा छळ केला जात आहे. या छळाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आलो आहे, तसेच माझ्या आत्महत्येस आपणच जबाबदार असाल', असा खळबळजनक संदेश लिहिला असल्याचं सांगितलं जात आहे.


आत्महत्येची धमकी देणारा हा संदेश जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविल्यानंतर तो काहींनी डीजीपींकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, हा संदेश सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात यावर चर्चा सुरू आहे.


'डीजीपींकडून होणारी सततची अवहेलना सहनशिलतेपलिकडची आहे. त्यामुळे आत्महत्येची वेळ आली आहे, स्वत:ला संपविण्यापूर्वी छळाबाबतची प्रत्येक गोष्ट माध्यम आणि कौटुंबिक सदस्यांकडे मांडेन' असंही जाधव यांनी पुढे म्हटलंय.