सोलापूर : अजिबात हातपाय न हलवता, तासंतास पाण्यावर तरंगत राहण्याची कला या ५३ वर्षीय हनुमंत सरडेंनी अवगत केली आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे,  असं म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही ओळख करून देणार आहोत, अशाच एका माशाची. नाही नाही. माशाची नाही, एका माणसाची. त्यांचं नाव हनुमंत सरडे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात चिखलठाण गावात राहणारा हा ५३ वर्षांचा शेतकरी. त्यांचं वजन ८३ किलो. पण कसलीही हालचाल न करता, पाच ते सात तास ते पाण्यावर सहज तरंगत राहतात. 


पाण्यात झोपुनच मांडी घालणं, हात डोक्यापासून वर नेणं असे प्रकार करुन दाखवतात. अगदी झोपल्या जागीच गप्पाही मारत बसतात. सरडे यांना लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. 


उजनी धरणामुळं त्यांच्या शेताचे दोन भाग झाले. एका भागातून दुसऱ्या भागात जायला ५ किमी अंतर कापावे लागायचे. पाण्यात पोहताना दम लागू नये म्हणून त्यांनी पाण्यावर तरंगण्याचा सराव सुरू केला. आणि आता पाण्यावर तरंगणारा माणूस अशी त्यांची ओळख बनलीय.


सतत पाण्यात राहणाऱ्या हनुमंत याना गावकरी 'पाणकोंबडी' म्हणून चिडवायचे. पण आता त्यांच्या या करामतीचं सगळे गावकरी कौतुक करतायत.


वैयक्तिक छंदासाठी त्यांनी हे काम सुरू केलं. आता त्यांना रेकॉर्ड बुकातली नोंद खुणावतेय. दररोज सात ते दहा तास पाण्यावर तरंगण्याची क्षमता निर्माण करायचीय. त्यासाठी सरडेंचा सराव सुरू झाला आहे.