कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई : देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात आतापर्यंत केवळ १५ गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत. अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळं मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्यातरी मर्यादा दिसून येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या यादीत आता भारताचेही नाव सामील झाले आहे. शस्त्रक्रियेद्वारे संबंधित महिलेच्या पोटात गर्भाशय बसवले असले तरी खरे आव्हान असणार आहे... ते त्या महिलेनं बाळ जन्माला घालण्याचे. 


कारण, जगभरात आतापर्यंत १५ गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून त्यापैंकी केवळ ५ महिलाच बाळाला जन्म देवू शकल्या आहेत. म्हणजे यशाची खात्री आहे ३३ टक्के... 


नवे तंत्रज्ञान असल्यानं ते जास्त खर्चिक असले तरी नंतरच्या काळात त्याचा वापर वाढू लागल्यानंतर खर्चही कमी होईल. पण सध्या तरी याची उपयोगिता बघण्यासाठी इतर स्त्री-रोगतज्ज्ञ वेट अॅन्ड वॉचचे धोरण अवलंबत आहेत, असं डॉ. नंदिता पालशेतकर यांचं म्हणणं आहे. 


विज्ञानाचं वरदान... 


गर्भाशय प्रत्यारोपण हे जन्मत:च गर्भाशय नसणाऱ्या महिलांना, बाळंतपणावेळी जटीलता निर्माण झाल्यानंतर महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भाशय काढला जातो अशा महिलांना आणि टीबीमुळं गर्भाशय खराब झालेल्या महिलांसाठी उपयोगी पडेल. गर्भाशय प्रत्यारोपण हे नवीन तंत्रज्ञान असून गर्भाशय नसलेल्या महिलांसाठी सध्या सरोगसी आणि स्टेम सेल ट्रिटमेंटच्या माध्यमातून मूल जन्माला घातले जात आहे.


मेडिकल टुरिझमला फायदा


गर्भाशय प्रत्यारोपण ही नव्या काळाची गरज आहे. आता याकडं दुर्मिळ शस्त्रक्रिया म्हणून पाहिले जात असले तरी येणाऱ्या काळात तंत्रज्ञान सुलभीकरणामुळं शस्त्रक्रिया वाढतील, अशा विश्वास व्यक्त केला जातोय. ज्याचा फायदा भारतासारख्या देशाला मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून होण्यास मदत होईल, अशी आशा फोनिक्स हॉस्पीटलचे स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. सौरभ सांगोरे यांनी व्यक्त केलीय. 


पुण्यातील गर्भाशय प्रत्यारोपणाच्या घटनेमुळं या नव्या तंत्रज्ञानाची भारतात यशस्वी मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. यामुळं देशातील काही महिलांसाठी एक आशेचा किरण नक्कीच निर्माण झाला आहे.