नितेश महाजन, झी मीडिया, जालना  : जालना पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं तसंच भाजप-शिवसेना युतीनंही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. यानिमित्तानं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीड सिटी, स्टील सिटी आणि मोठी व्यापारी बाजारपेठ ही जालना शहराची ओळख... त्यामुळं मराठवाडयातील महत्त्वाच्या पालिकांमध्ये जालनाचं नाव आवर्जून घेतलं जातं.


जालना पालिकेचं संख्याबळ 54 एवढं असून सध्या काँग्रेसचे 23, राष्ट्रवादीचे 9, शिवसेनेचे 10 तर भाजपचे केवळ 5 नगरसेवक आहेत. 5 नगरसेवक अपक्ष असून त्यात मनसे आणि बसपाचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. आता यावेळी 61 जागांसाठी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीची एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आलीय. उर्वरित ६० जागांसाठी होणा-या निवडणुकीत एकूण 682 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 184 अर्ज अवैध ठरल्यानं अनेक उमेदवारांची निवडणुकीआधीच विकेट पडली. तर नगराध्यक्षपदासाठी 33 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 6 अर्ज अवैध ठरलेत.
 
ही पालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत.
 
जालना पालिकेचं नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. काँग्रेसकडून कैलास गोरंटयाल यांची पत्नी संगीता गोरंटयाल, माजी नगराध्यक्ष पद्मा भरतीया यांचे अर्ज आलेत. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चुलतभाऊ भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या पत्नी शोभा अंबेकर यांनी अर्ज दाखल केलाय.
      
गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मतदारांना विकासकामांची आश्वासनं देण्यात आली होती. यापैकी अनेक आश्वासनं पूर्ण केल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय.
 
जालना पालिका आघाडीकडे आल्यास काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळणारेय. मात्र युतीकडून शिवसेना आणि भाजप या दोन्हीही पक्षांकडून एकेक अर्ज आल्यानं युतीचा नगराध्यक्ष कोण याबाबत अजूनही चर्चाच सुरू आहे.
 
या अटीतटीच्या लढतीत खोतकर आणि गोरंट्याल यांच्यापैकी कुणाच्या पाठीमागं जनता उभी राहते, हो पाहणं औत्सुक्याचं ठरणाराय....