पुणे : पारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का... तर, तो पुण्यातही असावा. त्यासाठी पुणे महापालिकेतही उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समिति नियुक्त करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. तर, हा निर्णय फक्त मुंबईसाठी नाही तर, संपूर्ण राज्यातील सर्व महापालिकांसाठी आहे, अशी माहिती पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा फंडा आणला. मात्र, शिवसेनेसाठी तयार केलेला हा फंडा भाजपच्या गळ्यात देखील अडकण्याची शक्यता आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समिती नियुक्त करावी या समितीत माजी सदनी अधिकाऱ्यांचा समावेश करावा. अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे. 


सामाजिक संस्था आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी ही मागणी केली असतानाच पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे देखील त्यासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निर्णय फक्त मुंबईसाठी नाही. तर, तो पुण्यासाठी आणि राज्यातील सर्व महापालिकांसाठी लागू आहे अशी माहिती शिरोळे यांनी दिलीय.  


 उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समितीचा निर्णय सर्व महापालिकांसाठी आहे. असं शिरोळे यांचं म्हणणं असलं तरी, राज्य सरकारने तरी अजून तशी अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा तसे आदेश काढले नाहीत. त्यामुळं शिरोळे यांचं म्हणणं भाजपला घराचा आहेर असू शकतो. पण राज्य सरकारने शिरोळे यांच्या म्हणण्याप्रमाणं किंवा सामाजिक संस्थांच्या मागणीवरून सर्वच महापालिकेत हा निर्णय लागू केल्यास भाजपचा आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही असा अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो.