पिंपरी-चिंचवडच्या महापौरही अजितदादांना `दगा` देणार?
राजकारणात भावनेला काहीच महत्व नसते याची पुरती जाणीव आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना व्हायला लागलीय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षाला राम राम केल्यानंतर आता पिंपरीच्या महापौरही अजित पवारांना धक्का देणार असल्याची चर्चा आहे
कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : राजकारणात भावनेला काहीच महत्व नसते याची पुरती जाणीव आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना व्हायला लागलीय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षाला राम राम केल्यानंतर आता पिंपरीच्या महापौरही अजित पवारांना धक्का देणार असल्याची चर्चा आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमधून पिंपरी चिंचवडमध्ये अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश मिळवला. खुद्द लक्ष्मण जगताप यांनी अजित पवारांची साथ सोडली तरी त्यांच्या गटाच्या शकुंतला धऱ्हाडे यांना महापौर पदावर कायम ठेवण्यात आलं.
सव्वा वर्षात महापौर बदलण्याचा निर्णय झाला असूनही धऱ्हाडे यांना अभय देण्यात आलं. पण आता त्यांच्याकडून अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपकडून शहरात अजित पवार यांना धक्का देण्याची रणनिती म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यात महापौर शकुंतला धऱ्हाडे यांच्यासह जगताप गटाचे अनेक जण भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
महापौरांनी यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेतली असतानाही अजित पवारांनी त्यांना जीवदान दिले. पण अजित पवारांचा हा चांगुलपणा महापौर विसरून भाजपमध्येच जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळं आपणच अभय दिलेल्या महापौरांकडून अजित पवारांना हा राजकीय आणि भावनिक धक्का असणार आहे.