मुंबई : मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने 'पॅनिक बटण' ची सुविधा सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा गैरवापर होत असल्याचे रेल्वे प्रशासनासमोर आलेय.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात 'पॅनिक बटण' या सुविधा दोन वेळा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे 'पॅनिक बटण' बाबत पुनर्विचार करण्याची भूमिका मध्ये रेल्वेने घेतली आहे. मध्य रेल्वेने सध्या एका लोकलमध्ये प्रायोगिक त्त्वावर महिलांच्या पाच डब्यांत पॅनिक बटणची व्यवस्था सुरू केली आहे. त्यास मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य लोकलमध्येही ही सुविधा सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे.

महिलांना रेल्वे डब्यात जर असुरक्षित वाटले किंवा आपातकालीन परिस्थिती उद्धवल्यास हे बटण दाबून तात्काळ मदत मिळवू शकतात. मात्र, गेल्याच आठवडय़ात दोन दिवस वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांमध्ये लोकल आली असता महिलांच्या डब्यातून या पॅनिक बटणाचा वापर करण्यात आला. मात्र, महिला प्रवाशांना कोणताही धोका नसताना त्याचा गैरवापर झाल्याचे उगडकीस आले. यामुळे दोन्ही दिवस लोकल सुमारे १५ मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. या घटनांची चौकशी केली असता महिलांसमोर कोणतीही आपातकालीन परिस्थिती अद्भवली नव्हती हे पुढे आले.

एखादी लोकल १५ मिनिटे एकाच ठिकाणी कोणत्याही कारणाशिवाय उभी राहिल्यास संपूर्ण वेळापत्रक बिघडते. गर्दीच्या वेळी तर प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. या परिस्थितीत पॅनिक बटणचा गैरवापर होण्याचे प्रकार वारंवार झाल्यास या योजनेचा पुनर्विचार करावा लागेल, असे मत रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.