अहमदनगर : संगमनेरमध्ये हनुमान जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. हनुमानाच्या मिरवणुकीचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो.  यामागे मोठी परंपरा आहे आणि इतिहासही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमनेरमधला हनुमान जयंतीचा उत्सव. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक निघते. विशेष म्हणजे हा रथ ओढण्याचा मान महिलांचा असतो. याला 90 वर्षांची परंपरा आहे. याची सुरुवात झाली ती एका ऐतिहासिक घटनेनंतर.स्वातंत्र्यपूर्व काळात १९२७ साली ब्रिटीशांनी संगमनेरमधल्या या हनुमान जयंतीच्या उत्सवावर बंदी घातली.



सलग दोन वर्ष ही बंदी कायम होती. पण 1929 साली कुठल्याही प्रकारे उत्सव साजरा करायचाच, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. तर काहीही झालं तरी उत्सव होऊ देणार नाही, असं ब्रिटीशांचं धोऱण होतं. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल १९२९ रोजी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी मिरवणुकीवर बंदी घातल्याचं जाहीर केलं.


नारीशक्तीपुढे पोलीस, ब्रिटीश अधिकाऱ्यांचे नमते


संगमनेरला छावणीचं स्वरुप आलं होतं. सशस्त्र पाचशे पोलीस गावात तैनात करण्यात आले. हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटेच मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. मंदिरात हनुमान जन्माचा सोहळा झाल्यावर मिरवणुकीची तयारी सुरू झाली. पोलिसांनी या मिरवणुकीला आडकाठी केली. तेवढ्यात संगमनेरमधल्या घराघरांतून महिला पुढे आल्या आणि त्यांनी पुढाकार घेत रथात हनुमानाची मूर्ती ठेवली.



दोनशे ते अडीचशे महिलांची संख्या पाहता पाहता पाचशे-सहाशे झाली आणि या महिलांनी हनुमानाचा रथ ओढायला सुरुवात केली. या नारीशक्तीपुढे पोलीस आणि ब्रिटीश अधिका-यांचं काही चाललं नाही. पोलीस काही करण्याआधीच महिलांनी रथ ओढत ओढत गावाच्या मुख्य रस्त्यावर नेला. पोलिसांनी मोटारी आडव्या लावत मिरवणूक रोखली. तेव्हा पाचशे ते सहाशे महिलांनी एकत्र येत गाड्यांची तोडफोड केली. अडवणा-या पोलिसांच्या डोळ्यांत गुलाल फेकला. बत्तासे फेकून मारले आणि ही मिरवणूक यशस्वी करुन दाखवली. तेव्हापासून आजपर्यंत या उत्सवातला हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. 
 
हनुमान ही शक्तीची देवता. या हनुमानाचा उत्सव साजरा करायचाच, या निर्धारानं संगमनेरमधली नारीशक्ती त्याकाळी एकत्र आली आणि तिच्यासमोर ब्रिटीशांनाही नमतं घ्यावं लागलं. तेव्हापासून रूढ झालेली ही परंपरा आजही कायम आहे आणि संगमनेरवासियांना त्याचा अभिमानही आहे.