यवतमाळ : पुलगावच्या केंद्रीय आयुध भंडाराला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या यवतमाळच्या प्रमोद ऊर्फ बादल मेश्राम यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. मेश्राम यांच्या मुळ गावी, पाटीपुरा इथं त्यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय राखीव दलातून निवृत्त झाल्यानंतर मेश्राम पुलगावच्या केंद्रीय आयुध भांडारात अग्नीशमन दलात रुजू झाले. ३० मे रोजी लागलेल्या भीषण आगीत भांडारातला दारुगोळा वाचवताना मेश्राम यांनी प्राणाची बाजी लावली. स्फोटामुळे त्यांचा मृतदेह ओळखण्यापलीकडे जळला होता. अखेर ७ दिवसांनी डीएनए चाचणी केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. 


आज पाटीपुरामध्ये मेश्राम यांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते. प्रमोद मेश्राम अमर रहेच्या घोषणांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहिदाला अखेरची मानवंदना देण्यात आली. प्रमोद यांची मुलं पार्थ आणि यथार्थ यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिली.