छेडाछेडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या
लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील भोपणी गावात सततच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
रुपाली श्रीधर जवळदापके असे त्या १८ वर्षीय मुलीचे नाव आहे. रुपाली ही देवणी इथे १२ वीत शिकत होती. गावातील संदीप बालजीराव दोडके हा २४ वर्षीय गावगुंड रुपालीवर एकतर्फी प्रेम करत होता.
रुपाली त्याला प्रतिसाद देत नसल्यामुळे आरोपी संदीप दोडके हा जाता येता तिची सतत छेड काढत असे. शिवीगाळही करीत असे. त्याच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून रुपालीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी संदीप दोडके विरोधात देवणी पोलिस ठाण्यात छेडछाड आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मात्र आरोपी फरार झाला आहे. दरम्यान यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी रुपालीच्या कुटुंबियांनी केली आहे.