प्रशांत परदेशी, नंदुरबार : 'झी २४ तास'नं सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारी मोहीम छेडली आहे. नुकतंच आपल्याला सातपुड्यात सुविधा आहेत पण कुपोषण आणि विविध आजार कसे अद्याप कायम आहेत याचं भयाण वास्तव दाखवलं होतं. आज जिल्ह्यातल्या अपुऱ्या आरोग्य यंत्रणांचा हा रिअॅलिटी चेक... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आहे. पण नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात कुपोषण, बालमृत्यू यासारखे प्रश्न असताना आरोग्य विभागात तब्बल 371 पदं रिक्त आहेत. त्यात 77 वैद्यकीय अधिका-यांची आहेत तर उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्याची आहेत. याच कारणामुळे ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था प्रभावित होतेय.  


जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणांवर देखभाल ठेवणा-या मुख्यालयातही तीच परिस्थिती आहे. मुख्यालयातल्या वर्ग एकच्या सहा पदांपैकी पाच पदं रिक्त आहेत. रिक्त पदांमुळेच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरवण्यात अडचणी येत असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनीही मान्य केलंय.  


राज्य सरकारनं ही रिक्त पदं तत्काळ भरून आदिवासी जनतेला न्याय द्यावा, एवढीच इथल्या नागरिकांची अपेक्षा...