मुंबई : शहरातील ७२ पोलीस स्टेशन्स अनधिकृत आहेत. पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. मात्र, गृहमंत्र्यांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यात स्वारश्य नाही. अनेक ठिकाणी वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नाही, अशी धक्कादायक माहिती काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी पालिकांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांचेच ठाणे अनधिकृत आहेत. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांपैकी एक-दोन नव्हे तर तब्बल ७२ पोलीस स्टेशन्स अनधिकृत आहेत.  मुंबईकरांच्या संरक्षणासाठी जीवाचे रान करून अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस दलाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे, असे राणे म्हणालेत. 


नागरिकांचा गाऱ्हाणी  ऐकणाऱ्या पोलिसांची गाऱ्हाणी ऐकायला राज्याच्या गृहखात्यालाही वेळ नसल्याचे आमदार राणे यांनी म्हटलेय. पोलिसांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, यावर गेले चार महिने मी अभ्यास करीत होतो. पोलिसांनाही त्यांचा अधिकार मिळायला हवा, पण त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवणारी संघटना असायला हवी, असे राणे यांनी यावेळी म्हटले.


गेले चार महिने राज्याच्या गृहखात्याकडून पोलिसांच्या मुलभूत सोयीसुविधांबाबत माहिती मिळविताना आम्हाला फार अडचणी आल्या. पोलिसांबाबत गृहखात्याचा कारभार अत्यंत हलगर्जीपणे चालवला जात असल्याचे आरोप आमदार राणे यांनी केलेत.


चार महिन्यांपासून पोलीस दलाबाबत माहितीसाठी जे काही अर्ज पाठवले, त्यापैकी आम्हाला एकाही अर्जाचे उत्तर मिळाले नाही. वारंवार अर्ज करूनही उत्तरे देण्यास केवळ टाळाटाळ केली जात असल्यामुळे दाल में कुछ काला असल्याचेही राणे यांनी आरोप केला.