`कॉस्मोपोलिटीन` मुंबईत `अमराठी` नगरसेवकांची वाढती संख्या
महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई `कॉस्मोपोलिटीन` असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...
कृष्णात पाटील, मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई 'कॉस्मोपोलिटीन' असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...
मराठी माणसानं पुकारलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळं मुंबई महाराष्टृात राहिली खरी. परंतु तेव्हा मराठमोळी असलेली मुंबई हळूहळू कधी बहुभाषिक झाली ते समजलेच नाही. त्यामुळं इथली राजकीय समीकरणंही पर्यायानं बदलत गेली.
मुंबईसाठी मराठी आणि अमराठी वाद काही नवा नाही. राज्य स्थापनेच्या आधीपासूनच हा वाद सुरू आहे. परंतु आता महापालिका निवडणुकीनंतर हा प्रश्न चर्चेला येण्याचे कारण म्हणजे मुंबईत अमराठी नगरसेवकांची वाढत असलेली संख्या...
२००७ ची आकडेवारी
मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक असून २००७ मध्ये पालिका निवडणुकीत ६७ अमराठी नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने गुजराती १३, उत्तर भारतीय १९ आणि मुस्लिम २१ होते.
२०१२ ची आकडेवारी
२०१२ मध्ये ६२ अमराठी नगरसेवक निवडून आले होते. यात गुजराती १७, उत्तर भारतीय १३ आणि मुस्लिम १९ होते.
२०१७ ची आकडेवारी
२०१७ च्या पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या अमराठी नगरसेवकांची संख्या आहे तब्बल ७३... यामध्ये गुजराती २४ असून त्यातील २३ जण हे भाजपचे आहेत. उत्तर भारतीय १५ आणि मुस्लिम २७ आहेत.
मुंबईतील मराठी टक्का जसजसा घटू लागला त़्याला अनुसरून अमराठी नगरसेवकांची संख्या वाढू लागली. अस्सल मराठी भाग म्हणून ओळख असलेल्या गिरगावात मराठीच अल्पसंख्यांक होण्याची वेळ आलीय, म्हणून तर तेथून पाच नगरसेवक हे गुजराती समाजातून निवडून आलेत. जे गिरगावमध्ये घडलं ते दादर, लालबाग, परळमध्ये घडण्यास वेळ लागणार नाही.
मुंबईतून मराठी माणूस कमी होत असल्याची कारण काय? याला जबाबदार कोण? हे गांभिर्याने घेण्याबरोबरच किमान आहेत तेवढ्या मराठी माणसांनी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली जातंय.
मुंबईत मराठी आणि शिवसेना हे एक घट्ट समीकरण राहिलं आहे. त्यामुळंच मुंबई कॉस्मोपोलिटीन होत असल्याचा सर्वाधिक फटकाही शिवसेनेलाच बसत असल्याचे दिसत आहे.
राजकारणातील मराठी टक्का अशा प्रकारे कमी होत असताना आणि मुंबईतील मराठी माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असताना आता शिवसेना आणि विशेषत: ठाकरे बंधू यासंदर्भात काय भूमिका घेतात, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.