अमोल पेडणेकर, मुंबई : मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.


पाड्याचं भकास चित्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सानिध्यात मुंबईच्या अगदी जवळ आणि तितकाच विकासापासून वंचित असलेला आदिवासी पाडा.... खरं तर हा पाडा मुंबईतील अनेक आदिवासी पाड्याचा प्रतिनिधित्व करतो. इथल्या आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो तो जंगलातील सुकी लाकडं, औषधी वनस्पतीच्या व्यापारावर... मात्र, या आदिवासींची ही जुनी ओळख पुसली गेलीय. हे आदिवासी समाजाच्या मूळ प्रवाहात येऊ पाहतायत त्यासाठी त्यांनी मुंबईच्या अगदी जवळ डोंगराचा पायथा गाठला. मात्र, त्यांचा विकास होण्याऐवजी त्यांची पडझड व्हायला सुरुवात झालीय. इतकी की, त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना परिस्थितीशी दोन हात करावे लागतायत. हातभट्टीच्या दारूनं या आदिवासींचे संसार उद्ध्वस्त झालेत. वृद्ध महिला, चेहऱ्यावरचं तेज हरपलेली लहान मुलं आणि विधवा असं भकास चित्र सध्या या पाड्यात दिसतंय. 


कधीकाळी स्वावलंबी असलेला हा आदिवासी पाडा आता जवळच्या शहरात जाऊन धुणी भांडी आणि मजुरी अशी मिळेल ती काम करतोय. विकासाच्या नावाखाली शहरही या पाड्याचा दिशेने अतिक्रमण करतायत. त्यामुळे हळूहळू हा पाडा शहराच्या मगरमिठीत स्वतःच अस्तित्व गामावून बसालाय.


आदिवासींना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न


प्राध्यापक कुमुद मिश्रा घटकोपर च्या झुंनझुनवाला महाविद्यालयात त्या 'फिज़िक्स' हा विषय शिकवतात. त्यांची नजर या पाड्यावर पडली आणि या परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांनी या पाड्याचा विकासाची नस ओळखली. शिक्षणाच्या माध्यमातून या आदिवासी पाडयाची पुढची पिढी घडवण्याचं काम सध्या कुमुद मिश्रा यांनी हाती घेतलंय. मात्र, त्यांच्यासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.


कुमुद यांच्या सहकारी रोज पाड्या पाड्यात जाऊन मुलांना चावडीवर गोळा करतात. शिक्षणाचं महत्व पटवून दिल्यानंतर पालकांनीही आपल्या मुलांना बालवाडीत पाठवायला सुरुवात केलीय. मात्र, काही मुलांना पालक त्यांच्या कामात मदत करण्यासाठी न्यायचे त्यामुळे काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पालकांना महिनाभराच रेशन देणं सुरु केलं. त्यानंतर पालकांनी आपली मुलं बालवाडीत पाठवण्यास सुरुवात केली.


छप्पर, भिंती नसलेली शाळा...


कुमुद मिश्रा यांच्या बालवाडीला छप्पर नाही, भिंती नाही ना कुठली खेळणी तरीही या बालवाडीतील प्रत्येक मुलं हे शिक्षणाच्या ओढीनं येतं... मुलुंडच्या आदिवासी पाडयापर्यंत मर्यादित न राहाता कुमुद मिश्रा यांनी कळवा आणि मानखुर्द या ठिकाणीही स्व-खर्चानं बालवाड्या सुरु केल्यात. कुमुद यांच्याबरोबरीने कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या या मिशनमध्ये सहभाग घेतलाय. त्यांच्या शिकवणीमुळे आता अनेक मुलं नियमित शाळेत जाऊ लागलीत.


गेली १५ ते २० वर्ष कुमुद मिश्रा आदिवासी पाड्यात जाऊन विद्यादानाचं काम करतायत. सरकार कडून कुठलीही अपेक्षा न बाळगता त्यांनी या बालवाडीतून शिक्षणाची आवड निर्माण झालेल्या अनेक विध्यार्थ्यानी यशाची शिखरं गाठलीत. हीच कुमुद मिश्रांच्या प्रयत्नांची पोचपावती आहे असंचं म्हणावं लागेल.