मुंबईत AC लोकल पुढच्या महिन्यात, एकच तिकीट प्रणाली : मुख्यमंत्री
लोकलमधील गर्दीचा प्रवास आणि गर्दीत घामाघूम होणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने थंडा थंडा कुल कुल प्रवासाचा दिलासा दिलाय.
मुंबई : लोकलमधील गर्दीचा प्रवास आणि गर्दीत घामाघूम होणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने थंडा थंडा कुल कुल प्रवासाचा दिलासा दिलाय. १५ मेपासून एसी लोकल धावणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच बस, मेट्रो, लोकलसाठी एकच तिकीट असणार आहे.
आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुंबईच्या दौर्यावर आलेत. यावेळी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरेश प्रभू यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एसी लोकल १५ मेपासून सुरु करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईत लवकरच सिंगल तिकीट प्रणाली राबवण्यात येणार आहे. त्यामुळे बस, मेट्रो, लोकलसाठी एकच तिकीट आकारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणार
महाराष्ट्रातील ९ रेल्वे प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल अर्थात विशेष कंपनीच्या माध्यमातू उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाले तर राज्यात रेल्वे जाळं वाढणार आहे. यात गेल्या २० वर्षातील प्रस्तावित आणि प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
बैठकीतील ठळक मुद्दे :
– हार्बरचे दोन्ही ट्रॅक डबलडेकर होणार
– २.३० ते २ मिनिटांनी रेल्वे हार्बरवर धावणार
– सर्व प्लॅटफॉर्म नवीन करणार
– स्टेशनच्या बाहेर शिवाजीमहाराजांच्या सात किल्यांच्या प्रतिकृती ठेवणार
– शिवनेरी किल्याच्या प्रतिकृतीवर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
सीएसटी- चर्चगेट स्टेशन जोडणार
– सीएसटी स्टेशनचे नवे रुप दिसणार!
– सीएसटी आणि मेट्रो स्टेशन भुयारी मार्गांनी एकमेकांना जोडणार
– तसंच हे दोन्ही स्टेशन्स चर्चगेटला भुयारी मार्गानं जोडणार
– आझाद मैदान, आझाद मैदानाच्या खाली मेट्रो स्टेशन
रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न
– राजकारणापलीकडे जाऊन रेल्वेचा विकास
– रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यावर भर
– महाराष्ट्राच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये ८५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार