मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार, हे निश्चित झालंय. तसंच, यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणार नाही, असं सिनेनिर्मात्यांनी स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर आणि या चित्रटाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार,  राज ठाकरे आज सकाळीच ९ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत शालिनी ठाकरे व अमेय खोपकरदेखील उपस्थित होते.


त्यापाठोपाठ काही वेळातच 'ऐ दिल है मुश्किल'चा निर्माता करण जोहर, निर्माते मुकेश भट आणि सिद्धार्थ रॉय कपूरही 'वर्षा' दाखल झाले.  


यानंतर झालेल्या बैठकीनंतर, मीडियासमोर आलेल्या महेश भट यांनी बैठकीतील काही मुद्दे स्पष्ट केले. यापुढे, भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणार नाही... तसंच 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा सुरु होताना स्क्रीनवर भारतीय जवानांना मानवंदना देण्यात येईल, असंही मुकेश भट्ट यांनी म्हटलंय. तसंच, 'आर्मी रिलीफ फंड'लादेखील या सिनेमाच्या उत्पन्नातून काही मदत करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलंय.


उरी दहशतवादी हल्ल्यानंतरही 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका असल्यानं मनसेनं या चित्रपटाला आक्षेप घेतला होता. पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला कुठलाही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मनसेनं भूमिका घेतली होती.