मुंबई : भारतीय नौदलाचे एकेकाळी ब्रम्हास्त्र म्हणून ओळखली जाणारी आयएनएस विराट येत्या ६ मार्चला ३० वर्षाच्या अविरत सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे. ब्रिटनच्या नौदलातली एचएमएस हर्मिस ते भारतीय नौदलातली आयएनएस विराट हा तब्बल 57 वर्षांची सेवा बजावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुस-या महायुद्धाच्या काळात बांधलेली विमानवाहू युद्धनौका अशी आयएनएस विराटची ओळख. १९८७ ला भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेली आयएनएस विराट भारताने इंग्लंड कडून विकत घेतली होती. त्याआधी इग्लंडच्या शाही नौदलात १९५९ ते १९८४ अशी २७ वर्ष HMS Hermes या नावाने कार्यरत विराट कार्यरत होती. (एचएमएस हर्मिसचे शॉट्स आहेत यु ट्यूबचे)


खरं तर दुस-या महायुद्धाच्या काळात जून १९४४ ला हर्मिसच्या बांधणीला सुरुवात झाली. मात्र १९४५ ला दुसरे महायुद्ध संपले त्यामुळे हर्मिसची बांधणी काहीशी लांबली. अखेर काळाची गरज ओळखून हर्मिसला इंग्लडच्या शाही नौदलाने १९५९  मध्ये त्यांच्या सेवेत दाखल करुन घेतले. हर्मिसने इंग्लिश नौदलाची सेवा चोख बजावली. 


१९८२ मध्ये अर्जेटिना विरुद्धच्या फॉकलंड बेटांच्या युद्धात हर्मिसने धडाकेबाज कामगिरी केली. तब्बल ४००० किमीचा इंग्लंड ते अर्जेंटिना असा प्रवास करत हर्मिसने हल्ला चढवला. फॉकलंडच्या युद्धात अर्जेंटीनाने इंग्लंडसमोर गुडघे टेकले यात हर्मिसचा मोठा वाटा होता.


त्यानतंर १९८४ ला इंग्लंडने हर्मिसला सेवेतून निवृत्त केले. तेव्हा भारताने स्वतःची गरज लक्षात घेत ही विमानवाहू युद्धनौका इग्लंडकडून विकत घेतली. तिचेंनुतनीकरण केले आणि १९८७ ला आयएनएस विराट नावाने ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. 


विराटचा दबदबा... 


भारताने विराट विकत घेतांना इंग्लंडकडून एकूण २४ सी हॅरियर लढाऊ विमाने विकत घेतली. जगात एक अद्वितीय, वैशिष्ट्यपूर्ण विमान अशी या सी हॅरियरची ओळख आहे. या विमानांची लढाई करण्याची झेप सुमारे एक हजार किमी असल्यानं विराटचा दबदबा हिंदी महासागरांत, अरबी समुद्रात निर्माण झाला.


भारतीय नौदलात १९८७ ते २०१७ या काळांत कार्यरत असतांना विराटने थेट युद्धात कधी सहभाग घेतला नसला तरी १९८७ -९० च्या काळात श्रीलंकेतल्या एलएलटीई विरोधातल्या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. 


२००१ च्या 'ऑपरेशन पराक्रम'च्या वेळी भारत पाकिस्तान देशांचे लष्कर समोरासमोर उभे ठाकले होते. तेव्हाही आयएनएस विराटने सज्ज होत पाकिस्तानच्या सागरी सीमेवर खडा पहारा ठेवला होता. 


भारतीय नौदलात दाखल...


१९८७ मध्ये  विराट भारतीय नौदलात दाखल जरी झाली असली तरी पुढील किमान १० वर्षे कार्यरत राहील असे नौदलाने गृहीत धरले होते. मात्र विराटमधील उपकरणे इतक्या चांगल्या दर्जाची होती की विराटने अपेक्षेपेक्षा २० वर्ष जास्त म्हणजेच एकूण ३० वर्षे भारतीय नौदलाला सेवा दिली. 


१९८७ ते २०१७ या काळांत विराटची तब्बल पाच वेळा डागडुजी करण्यात आली . वेळोवेळी तिचं आय़ुष्य वाढवण्यात आलं. त्यामुळे कार्यरत असलेल्या विराटला बघून इंग्लंडनेही तोंडात बोटं घातली. 


मात्र वारंवार होणा-या सी हॅरियरच्या अपघांतामुळे विराट काही काळ चर्चेत राहीली होती. अखेर वैशिष्टयपूर्ण अशा विराटवरील सी हॅरियर लढाऊ विमानांना २०१६ मध्ये सन्मानपुर्वक निरोप  देण्यात आला.  हेलिकॉप्टरही काढून घेण्यात आली.  विराटवर काम करणं हे नौदलातील अधिकारी किंवा कर्मचारी यांचं एक स्वप्न असायचं. 


१९८७ पासून आत्तापर्यंत २२ कमांडिग ऑफिसरनी विराटचे प्रमुख म्हणून काम केले.  यापैकी ५ विराट प्रमुख हे नंतर नौदल प्रमुख झाले हे विशेष. तर अनेक जणांनी नौदलाच्या विविध विभागात प्रमुख म्हणून जवाबदारी पार पाडली.  १९८७ पासून कार्यरत असलेली विराट भारतीय नौदलाची शान होती, ब्रम्हास्त्र होती, नौदल विराटला प्राणपणाने जपायचे. २०१३ ला आय़एनएस विक्रमादित्य दाखल झाली आणि वृद्ध झालेल्या विराटचंही महत्व कमी झालं. 


विराटला अलविदा...


विराटला अलविदा करतांना विराटवर काम केलेले अनेक आजी-माजी अधिकारी,कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत. यावरुन विराटवर नोदलाचं किती प्रेम आहे हे दिसतं. एवढंच नाही विराटच्या निरोप कार्यक्रमात इग्लंडमधील माजी अधिकारीही उपस्थित रहाणार आहेत यावरुन विराटबद्दल नौदलामध्ये काय भावना आहेत हे सहज लक्षात य़ेते. विराटची जागा आता अधिक शक्तिशाली अशा आयएनएस विक्रमादित्यने घेतली आहे. तरी विराट मात्र नौदलाच्या कायम स्मरणात रहाणार आहे.