मुंबई: एअरटेल या दूरसंचार कंपनीने देशातील पहिल्या पेमेंट बॅंकेची सुरूवात राजस्थानातून केली आहे. एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बॅंक इंडियाने एअरटेल पेमेंट बॅंकला अधिकृतरित्या परवाना दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने आपल्या पेमेंट बॅंक खातेदारांना ७.२५ टक्के व्याजाची ऑफर दिली आहे .परंतु भारतातील बहुतेक बॅंका या फक्त ४ टक्के व्याज देतात. देशात अशाप्रकारची सेवा देणारी एअरटेल ही पहिली कंपनी आहे.


एअरटेलने सांगितलेल्याप्रमाणे, एअरटेल पेमेंट बॅंक ही भारती एअरटेलची सहाय्यक कंपनी आहे. राजस्थानातील छोट्या गावातील आणि शहरातील ग्राहक एअरटेल पेमेंट बॅंक खाते रिटेलर आऊटलेट्सवर जाऊन सुरू करू शकतात. आणि त्यांचा एअरटेल मोबाईल क्रमांकचं त्याचा बॅंकखाते क्रमांक असणार आहे. ही बॅंक पूर्णतः डिजिटल आणि पेपरलेस असणार आहे.


एअरटेल सध्या आपल्या राजस्थानातील १०,००० रिटेल आऊटलेट्सच्या माध्यमातून बॅंकींग सेवा देणार आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत एअरटेल राजस्थानातील व्यापारी संबंध वाढवून एअरटेल बॅंक योजना एक लाख लोकांपर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्नात आहे.


एअरटेल पेमेंट बॅंक खातेदारांना एटीएम आणि डेबिट कार्ड सुविधा जाहीर केली नाही. परंतु ग्राहक एअरटेल रिटेल आउटलेट्स जाऊन पैसे काढू शकतात. तसेच एअरटेल पेमेंट बॅंक योजना प्रत्येक बॅंक खात्यासोबत एक लाखाचा खाजगी दुर्घटना विमासुध्दा देणार आहे.  


या बॅंकींगसेवेचा वापर मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील करता येणार आहे. तसेच *४००# क्रमांक डायल करून ही बॅंकींग सेवा
आपल्या मोबाईलमध्ये देखील वापरता येऊ शकणार आहे.  


एअरटेल पेमेंट बॅंकचे एमडी आणि सीईओ शशी अरोडानी सांगितले की, या बॅंकींग प्रकल्पाने आम्ही बॅंकसेवेत मोठे पाऊल टाकले आहे. आणि आगामी काळात भारतात मोठ्याप्रमाणावर एअरटेल पेमेंट बॅंकसेवा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.