दीपक भातुसे, मुंबई : निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्व पक्षांनी आता आघाडी-युतीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत युती-आघाडी होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच निवडणुका जाहीर होताच दोन्ही पातळीवर फोनवरून संपर्क करण्यापर्यंत युती-आघाडीची दारं खुली झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मिनी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता युती-आघाड्यांच्या चर्चेचं गुऱ्हाळही सुरू झालं आहे. दर पाच वर्षांनी ज्याप्रमाणे निवडणुका येतात, त्याचप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यत युती-आघाडी करण्याबाबत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू राहतं. या चर्चेतून काही ठिकाणी युती-आघाड्या होता, तर काही ठिकाणी फिसकटतात. यावेळी मात्र युती-आघाडीच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामागचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यामुळे आताच्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार, विशेषतः मुंबई महापालिकेत काय होणार याबाबत उत्सुकता आहे.


विशेषतः मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाची युती होणार का याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना-भाजपामध्ये मुंबई महापालिकेतील कारभारावरून संबंध ताणले गेले असतानाही आता दोन्ही पक्षांनी किमान युतीकरण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्ष सत्तेत असताना अनेक निवडणुका एकत्र लढवल्या. मात्र मागील वर्षभरापासून दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत युती होते की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र दोन्ही पक्षातही आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.


राज्यात २०१२ साली झालेल्या निवडणुकीत मुंबईसह काही महापालिकांमध्ये शिवसेना-भाजपाची युती झाली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही महापालिका आणि काही जिल्हा परिषदांची निवडणूक आघाडी करून लढवली होती. यावेळी आता दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू झाली असून विधानसभेप्रमाणे आघाडी आणि युतीची चर्चा फिसकटणार की खरोखर आघाडी आणि युती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.