अग्निशमन दलाची जीवघेणी भरती प्रक्रिया, 200 उमेदवार जखमी
आगीपासून नागरिकांचा जीव वाचवणा-या मुंबईतल्या अग्निशमन दलाची भरती प्रक्रियाच उमेदवारांसाठी जीवघेणी ठरत आहे.
मुंबई : आगीपासून नागरिकांचा जीव वाचवणा-या मुंबईतल्या अग्निशमन दलाची भरती प्रक्रियाच उमेदवारांसाठी जीवघेणी ठरत आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात ७७४ फायरमॅन पदांसाठी भरती सुरू आहे. मैदानी चाचणीत उमेदवारांना १९ फूट उंचावरून जम्पिंग शिटवर उडी मारावी लागते. पण याचा सराव कुणालाच नसल्याने आणि सुरक्षततेची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक उमेदवार जखमी झालेत.
कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल असलेला 24 वर्षीय धुळ्याचा दीपक पाटील याच जीवघेण्या उडीचा बळी ठरला आहे. त्याच्या पायाचे हाड मोडले असून पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
उपचाराचा खर्चही आता त्यालाच करावा लागणार आहे. भरती सुरू झाल्यापासून म्हणजे १९ ऑगस्टपासून रोज १५ ते २० जण अशा प्रकारे जखमी होत आहेत. ही संख्या आता 200 च्या वर गेली आहे.
एवढ्या मोठ्या संख्येनं तरूण जखमी होत असले तरी अग्निशमन दल मात्र ही पात्रता चाचणी योग्यच असल्याचं सांगतंय, तसंच त्यांच्या मते केवळ २० ते २२ तरूणच जखमी झालेत. नोकरी मिळण्यापूर्वीच जीवाशी खेळ सुरू असल्यामुळं पात्रतेसाठी अशा जीवघेण्या उडीचा निकष रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.