मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय. दिग्विजय सिंग यांनी माझ्यावर केलेले 'वशीलेबाजी'चे आरोप 'निराधार' असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सिंग हे एका महिलेच्या खांद्यावरुन त्यांचा राजकीय डाव साधू पाहातायत. असं कृत्य म्हणजे एका कर्मचारी महिलेचा अपमान आहे,' अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली.


दिग्विजय सिंगांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता अॅक्सिस बँकेत काम करत असल्याने झोपडपट्टी पुनर्वसन विकासकांना त्यांची खाती अॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेत उघडायला लावली, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना 'मी अॅक्सिस बँकेच्या लोअर परेल शाखेत काम करते. त्यांनी ज्या व्यवहाराचा उल्लेख केला तो वरळी शाखेत झाला. माझा त्याच्याशी काही संबंध नाही', अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.


देवेंद्र फडणवीसांचे वकील गणेश सोवनी यांनी दिग्विजय सिंगांना या आरोपांसाठी देवेंद्र फडणवीसांची माफी मागावी, असं म्हटलंय. असं न केल्यास देवेंद्र फडणवीस कायद्याचा मार्ग स्वीकारतील, असंही त्यांनी पुढे सांगितलंय.


दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या उत्तरानुसार मागील काँग्रेस सरकारनेच विकासकांना अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय बँकेचा पर्याय दिल्याचं सांगितलं आहे.