ठाण्याहून कपिल राऊतसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई :  मुंबईसह देशभरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या साह्याने उधळून लावलाय. युपी एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली स्पेशल सेल, सीआर सेल, आंध्रप्रदेश, पंजाब पोलीस आणि बिहार पोलिसांनी मिळून आयसीसच्या ३ दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून या तीन दहशतवाद्यांनी आपल्या साथीदारांसोबत भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट रचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईतल्या भायखळा इथल्या या दहशतवादी विरोधी पथकाच्या कार्यालयात बुधवारी दुपारी अचानक वर्दळ वाढली. एक दोन नाही तर ४ राज्यातील एटीएस पथकं इथे एकत्रित झाली. मुंबई एटीएसच्या अधिकाऱ्यांसह परराज्यातील एटीएस पथकं ठाण्याच्या दिशेने तातडीने रवाना झाली. 


मुंब्य्रात या पथकाने कारवाई केली. मुंब्य्रातून अटक झालेल्या नझीम शमशाद अहमद या तरूणाबाबत युपी एटीएसला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र एटीएसची मदत घेऊन नझीमला बेड्या ठोकल्या. 


नदीम हा मुंब्य्रातून इंटरनेटच्या माध्यमातून युपीतल्या एका आयसीस दहशतवाद्याच्या संपर्कात होता. राज्यातल्या तरूणांची माथी भडकवून त्यांना आयसीस या दहशतवादी संघटनेसाठी काम करायला नजीम प्रवृत्त करायचा. नजीम २ ते ३ महिन्यांपूर्वीच युपीतल्या बिजनौर इथून मुंब्रा इथे राहायला आला होता.



त्याच्यावर युपी एटीएस पाळत ठेऊन होती. ठोस पुरावे मिळताच युपी एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने नजीमच्या बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या. 


मुंब्य्रात नजीमला अटक झाली त्याचवेळी जालंधर आणि पंजाब इथेही युपी एटीएसने स्थानिक एटीएस पथकांसह २ जणांना अटक केलीय. हे सगळे युपीतल्या बिजनौरचे रहिवासी आहेत. दहशतवादी कारवायांसाठी मुलांची भरती करणे आणि दहशतवादी कारवायांचा कट रचणे हे त्यांचं काम होतं. 


गंभीर मुद्दा म्हणजे इंडियन मुज्जाहिदीनच्या धर्तीवर भारतात नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना कऱण्यात आली होती. हे सर्वजण या संस्थेसाठी आयसीसच्या एका कमांडरच्या संपर्कात होते. आयसीसचं भारतातील अॅक्टींग मॉड्यूल तयार करून भारतात दहशतवादी कारवाया करणं ही जबाबदारी तिघांवर सोपवली होती. एकूण १२ जणांचा हा ग्रुप आहे. त्यामुळे इतर फरार दहशतवाद्यांचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत. 



यासाठी युपी एटीएसने बिहारच्या नरकटियागंज, युपीच्या बिजनौर और मुजफ्फरनगर येथे सर्च ऑपरेशन सुरु केलय.